राजीव सेनपासून घटस्फोट घेतल्यानंतर टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आपली मुलगी झियानाला एकटीने वाढवत आहे. अलीकडेच टीव्ही अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चारूने सिंगल मदरसाठी शहरात अपार्टमेंट मिळणे किती कठीण आहे, हे सांगितले. त्यावेळी ती खूप भावूक देखील झालेली.
चारू असोपाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चारू रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना चारूने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आपल्या समाजात महिलेने काहीही केले, कितीही केले तरी लोकांची विचारसरणी कधीच बदलू शकत नाही. आजही स्त्रीला घर देण्याआधी तिचं कोणत्या पुरुषाशी नाव जोडलं आहे की नाही हे पाहिलं जातं. आणि पुरुषाचं नाव नसेल तर तिला घरही दिलं जात नाही. इथल्या स्त्रियांची ही अवस्था पाहून वाईट वाटतं. हे जे लोक घर देण्यास नकार देतात तेच पुढे बाहेर जाऊन महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली मोठमोठी भाषणे देतात."
आपला मुद्दा पुढे करत चारू म्हणाली – आज पुन्हा मला एका सोसायटीत घर नाकारण्यात आले. कारण मी सिंगल मदर आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे नकार देणारीसुद्धा एक महिलाच होती. ज्या देशात महिलांची पूजा केली जाते त्या देशातील महिलांची ही दिशा आहे.
चारू असोपाचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.