Close

कूल थंडीची हॉट स्टाइल (Cool Winter Hot Style)

डिसेंबर उजाडला की, गुलाबी थंडी पडायला सुरुवात होते. हल्ली हुडहुडी भरणारी थंडी पडत नसली तरी थंडी सेलिब्रेट केली जातेच. या ऋतूला साजेसा मेकअप, फॅशन आणि स्टाइल यांचा मेळ घालत तुमची थंडी सेलिब्रेट करण्याची नवी स्टाइल कशी असावी हे जाणून घ्या.
थंडीचा माहोल आला की, वेगवेगळ्या विंटरवेअर्सची कलेक्शन्स आपल्याला भुरळ पाडू लागतात. वॉर्डरोबमध्ये नेहमीच्या कपड्यांबरोबरच थंडीसाठीही विविध पेहरावांची व्हरायटी हजर होऊ लागते. थंडीच्या ऋतूला साजेशा नव्या फॅशन ट्रेण्डची माहिती करून घेऊया.
बोचणार्‍या थंडीपासून बचावासाठी या वेगवेगळ्या स्टाईल करताना तुमची छबी वेगळी दिसावी असं तुम्हाला वाटत असेलच ना. या उबदार कपड्यांमध्येही असंख्य व्हरायटी पाहायला मिळतात. स्वेटशर्ट, जर्कीन आणि स्वेटर्स ही झाली नेहमीची फॅशन. हल्ली तरुणांची पसंती यापेक्षा वेगळी असते. म्हणूनच वेगवेगळ्या ब्रॅण्डने विविध पेहरावांचा पर्याय आणला आहे. जॅकेट, लाँग जॅकेट, वेस्ट कोट, डेनिम, हूड या पेहरावांची हिवाळ्यात चलती असते. फॅशन आणि उपयुक्तता यांचा मेळ साधणार्‍या या पेहरावांना सध्या भरपूर मागणी आहे.
डेनिम
पूर्वी केवळ जीन्ससाठीच डेनिमच्या कापडाचा वापर केला जायचा. मात्र आता डेनिमचं स्वरूप बदललं आहे. डेनिमच्या कापडाचे टॉप, टी शर्ट, वेस्टकोट, जॅकेटस् यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येते. डेनिमच्या जाड कापडामुळे थंडीतही हे कपडे वापरता येतात. हल्ली काही ब्रॅण्ड खास डेनिमचे विंटर स्पेशल कलेक्शन सादर करतात. यात जॅकेट, लाँग जॅकेट, शर्ट, टी शर्ट, वेस्ट कोट आणि पुलओव्हरही पाहायला मिळतात. 
डेनिमचे जॅकेट थंडीमध्ये ऊब मिळवून देण्याचं काम करते. शिवाय ते इतर ऋतूमध्येही वापरता येतात. डेनिमचे टी शर्ट हे डेनिम आणि कॉटनचा एकत्र वापर करून बनवलेले असतात. यामुळे त्यांना एक छान लूकही मिळतो.
वेस्ट कोट 
विंटर कलेक्शनमध्ये सर्वाधिक पसंती दिली जाते ती वेस्टकोटला. सध्या वेस्टकोट हे तरुणांचं आकर्षण ठरले आहे. कॉलेजमध्ये जाणार्‍या मुलांपासून ते कॉर्पोरेट ठिकाणी सगळीकडेच वेस्टकोटला पसंती दिली जाते. जाड, सुती टी शर्ट वा शर्टवर हे वेस्ट कोट शोभून दिसतात. शिवाय जरासा रफटफ लूकही शोभून दिसतो. 

लाँग जॅकेट्स
वेस्टकोटबरोबरच हल्ली चलती आहे ती लाँग जॅकेटच्या ट्रेण्डची. लाँग जॅकेटसाठी जाड कापड वापरलं जातं. हे जॅकेट लांबीला गुडघ्यापर्यंत असतात. यामुळे डिसेंबरमधील थंडीसाठी या जॅकेट्सचा पर्याय उत्तम आहे.
पुलओव्हर
जीन्सबरोबर थंडीत चांगला पर्याय असतो पुलओव्हरचा. लोकरीचे किंवा कॉटनचे असे थंडीला साजेसे पुलओव्हर्स सध्या उपलब्ध आहेत. यातही व्ही नेकचा पुलओव्हर सगळ्यांच्याच आवडीचा. पार्टीवेअर लूकसाठी ए लाइनचे, फुल स्लीव्हचे पुलओव्हरही आहेत. हल्ली नी लेंग्थचे पुलओव्हरही  मिळतात. यावर डेनिम अथवा ब्लॅक स्लॅक्स घालावी. याचबरोबर पोलोनेक टीशर्ट आणि हायनेक स्वेटर्सचीही मागणी वाढत जाते. पोलो नेक टीशर्टवर त्याला साजेसं जाकीट अथवा गडद रंगाचा स्टोल उत्तम दिसतो. 
जॅकेट
थंडीच्या महिन्यांत सकाळी बाहेर पडणं गरजेचं असेल तर कोणत्याही पेहरावावर जॅकेटचा पर्याय उत्तम असतो. साध्या टी शर्टवर डार्क ब्लू रंगाचं जॅकेट घातल्याने ऊब तर मिळतेच, शिवाय कपड्यांना नवा लुकही येतो. या जॅकेट्सचा जुना कोटासारखा दिसणारा व्हिंटेज लुक बदलून त्यामध्ये आता अनेक प्रकार आले आहेत. केवळ लुकमध्येच नाहीतर कपड्याच्या प्रकारातही विविधता आढळते. 
आतील बाजूने फर किंवा लोकरीचा उबदारपणा देणारे नायलॉन, शिफॉनमधील जॅकेटस्ना सध्या बाजारात मागणी आहे. थंडीतील रोजच्या पेहरावात हे जॅकेट चांगलीच ऊब देतात. याशिवाय थंडीत ट्रेकिंगला जाताना किंवा बाइकवरून जाताना वापरण्यासही सोयीची आहेत. या जॅकेटमध्ये सध्या लेदर, जीन्स हे चांगले पर्याय आहेत. शिवाय हे उत्तम फॅशन स्टेटमेंट आहेत. याबरोबरच हल्ली लोकरीच्या आणि होजिअरीच्या जॅकेट्सनाही चांगलीच मागणी आहे. 
हल्ली या ट्रेण्डी लुकमध्ये ज्यूटच्या जॅकेटची भर पडत आहे. या कपड्याच्या बनावटीमुळे याला अधिक पसंती मिळत आहे. लाल, गडद निळा, कॉफी, चॉकलेटी, सफेद, काळा या रंगांमध्ये ही ज्यूटची जॅकेटस् उपलब्ध असतात. याचबरोबर हल्ली आर्मी स्टाइल जॅकेटस्चाही खूप बोलबाला आहे. ‘जब तक है जान’ मधल्या किंग खानच्या आर्मी लूकमुळे प्रभावित झालेल्या तरुणाईची अशा जॅकेटस् आणि टोप्यांना जास्त पसंती असते. 

हूड
थंडी म्हटलं की, हातभर लांब स्वेटर आणि कानटोपी असाच पूर्वी पेहराव असायचा. पण कानटोपीला आता हूडचा पर्याय आहे. हूड म्हणजे कानटोपीचा मॉडर्न लूक. जाड कापडाच्या टी शर्टला पाठीमागच्या गळ्याजवळ हे हूड जोडलेले असते. त्यामुळे थंडीपासून बचाव होतो. हे हूड तरुण-तरुणी दोघेही वापरू शकतात. शिवाय त्याच्या बलून स्टाइलमुळे जाड वा बारीक कोणत्याही व्यक्तीला हे शोभून दिसतात. साध्या टी शर्टप्रमाणे व पाठीमागे गोल टोपी जोडलेले हूड, झीपर हूडसह असलेले हूड असे विविध प्रकार मिळतात. यातही हल्ली हूडला नवा लुक देण्यात आला आहे तो म्हणजे फरचा. स्टे्रट फिटींगचे लांब असणारे व पुढील भागात फर लावलेले हूड तरुणींसाठी बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय लांब हाताचं टी शर्ट घालून त्यावर घालण्यात येणारे स्लीवलेस हूडही बाजारात मिळतात.
स्टोल
जॅकेट, हूड आणि स्वेटशर्टबरोबरच स्कार्फ, मफलर, वेगवेगळे स्टोल, शाल यांचीही रंगीबेरंगी फॅशन हिवाळ्याच्या मोसमात बहरू लागते. जीन्स, टीशर्ट आणि त्यावर जाकीट किंवा स्कार्फ ही स्टाईल तर आवडण्यासारखीच आहे. थंडीत घालायचे कपडे असले तरी ते फॅशनेबल कसे असतील याकडे मुलींचा भर असतो. याकरिता क्रोशिया डिझाइनचे कॉटन वा वुलनचे स्टोल, जॅकेट हा चांगला पर्याय आहे. स्टोल्सप्रमाणेच मंकी कॅप, हेअर कॅप आणि ब्रॉड हेअर बॅण्डनाही फॅशननुसार पसंती दिली जाते. मुलींसाठी कॉटन व मलमली कपड्यांचे स्कार्फ आहेतच पण त्याचबरोबर पश्मिना स्टाइलचे किंवा लोकरीचे स्कार्फही बाजारात मिळतात. मुलींंसाठी खास गुलाबी, निळा, ब्राऊन अशा रंगांमध्ये हे स्कार्फ मिळतात. यातही जाळीदार, फुलांची नक्षी आणि झालर असलेले स्कार्फ जास्त पसंतीस उतरतात. 
डिसेंबरच्या सुरुवातीला अशी कूल सीझनची हॉट स्टाइल आता बहरू लागलीय. बोचर्‍या थंडीत डोळ्यांना दिलासा देणारी तुमची स्टाइल सगळ्यांचं लक्ष तुमच्यावर खिळवून ठेवेल यात शंका नाही. 

Share this article