Close

आवरा तुमची भूक (Curb Your Appetite)

खाण्यापिण्याचे शौकीन असणार्‍यांना, आपला जन्म खाण्यासाठीच झाला आहे, असे वाटते. त्यामुळे होतं काय की, भूक असो वा नसो, ही माणसं सतत खात असतात. त्याचे दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर दिसून येतात


ण्यापिण्याचे शौकीन असणार्‍यांना, आपला जन्म खाण्यासाठीच झाला आहे, असे वाटते. त्यामुळे होतं काय की, भूक असो वा नसो, ही माणसं सतत खात असतात. त्याचे दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर दिसून येतात. कारण खाण्याचे पण काही नियम आहेत. कितीही नि कसंही खाल्लं तर ते पचत नाही. घरात किंवा ऑफिसात बोअर झाले की, काहीबाही खाण्याकडे अशा लोकांचा कल असतो. ’टाइम पास‘ म्हणून देखील खाणारे लोक आहेत. थोडक्यात काय तर, जातायेता काहीतरी तोंडात टाकण्याची सवय आपल्यालाही असेल तर स्वतःला आवरा. ही अनावश्यक भूक आवरण्यासाठी हे सोपे उपाय करून पाहा.
वर सांगितल्याप्रमाणे बोअर झाल्यास किंवा कंटाळा आल्यास काहीबाही तोंडात टाकून अंगातली चरबी वाढविण्यापेक्षा सरळ जागेवरून उठा व घराबाहेर किंवा ऑफिसच्या बाहेर जाऊन एक फेरी मारून या. चक्क पाच मिनिटांचा वॉक घ्या. अवेळी काही खाऊन अपचनास आमंत्रण देण्यापेक्षा चालून पचनास मदत करा.

फळे खा
भुकेच्या वेळी सहज मिळणारा वडापाव किंवा वेफर्स, फरसाण, चिवडा असे तेलकट पदार्थ खाण्याऐवजी फळे खाल्लीत तर शरीरात चरबी साठणार नाही. सफरचंद, एखादे संत्र, केळ, थोडी द्राक्षे हे पर्याय जास्त चांगले.

सुकामेवा सर्वोत्तम
आपण जेव्हा काही कारणाने नर्व्हस होतो किंवा टेन्शन येते तेव्हा काही सुचेनासे होते. अशा वेळी गोड खाणे चांगले. नाहीतरी, एखाद्याला चक्कर येते किंवा ब्लड प्रेशर कमी होते तेव्हा त्याच्या जिभेवर साखर टाकण्याची आपली पद्धत आहे. कारण त्याच्याने लगेचच रक्तातील साखर वाढते नि बरे वाटते. तेव्हा नैराश्य आणि टेन्शन यावर गोडाचे औषध लागू पडू शकते. मात्र क्रिमवाली मैद्याची बिस्कीटे किंवा मैद्याचे गोड पदार्थ खाण्यापेक्षा गुळाचा खडा, मध, पाणी अथवा बिस्कीटच खायचे झाल्यास फायबरयुक्त, पचायला हलके बिस्कीट खावे. थोडक्यात काय तर गुलाबजामपेक्षा रसगुल्ला बरा. असे आपल्या आवडीचे पण पचायला हलके गोड पदार्थ खावे. अंजीर, जर्दाळू, बेदाणे हा सुकामेवा तर सर्वोत्तम.

चॉकलेटस् बरी
लहानांप्रमाणेच मोठ्यांना देखील चॉकलेटस् आवडतात. मानसिक ताणतणाव कमी करण्यास चॉकलेटस् कामी येतात, असा काही लोकांचा अनुभव आहे. तेव्हा गोड पदार्थ म्हणून चॉकलेट तोंडात टाकायला हरकत नाही. मात्र आपल्या हाताशी ठेवायची चॉकलेटस् लहान आकाराची ठेवा. एखाद दुसरेच ठेवा. कारण जास्त प्रमाणात चॉकलेटस् खाणं आरोग्यास उपकारक नाही.

च्युईंगमचा पर्याय
मानसिक तणाव कमी करण्यासाठी च्युईंग गम हा देखील चांगला पर्याय आहे. तो चघळण्याने भूक पण मारली जाते. तेव्हा भुकेला आवर घालण्यासाठी च्युईंग गम चघळायला हरकत नाही. मात्र तो चांगल्या दर्जाचा असावा. अन् आताशा शुगर फ्री गम मिळतो. तो जास्त चांगला.

Share this article