दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलीवूडचे रोमॅंटिक कपल नेहमीच चर्चेत असते. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका व रणवीर आई-बाबा होणार आहेत. त्याबाबत दीपिका-रणवीरने सोशल मीडियावर २९ फेब्रुवारीला चाहत्यांना पोस्ट शेअर करीत ‘गुड न्यूज’ दिली होती. सध्या दीपिका तिची प्रेग्नन्सी चांगलीच एन्जॉय करताना दिसतेय.
दीपिका तिच्या गर्भारपणाचा आयुष्यातील एका सुंदर टप्प्याचा आनंद घेत आहे. दीपिकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यात दीपिकाने भरतकाम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत, तिनं लिहिलं, “आशा आहे की, हे भरतकाम पूर्ण झाल्याचा फोटोही मी शेअर करू शकेन.”
दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे. “तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ घालवत आहात, असं दिसतंय,” असं एका चाहत्यानं कमेंट करीत लिहिलं. “ती तिच्या बाळासाठी भरतकाम करते आहे,” अशी प्रतिक्रिया दुसऱ्याने दिली.
“या भरतकामाचा संपूर्ण फोटो पाहण्यास उत्सुक आहे,” असं एका युजरनं लिहिलं. तर, अभिषेक बच्चनची बहीण श्वेता बच्चन हिनं स्माईलीची इमोजी शेअर करीत कमेंट केली.
दीपिका पादुकोणचा पती रणवीर सिंह, क्रिती सेनॉन व मनीष मल्होत्राबरोबर नुकताच काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन घेऊन आला. तेव्हा रणवीरला मुलगा हवाय की मुलगी यावर रणवीरनं सांगितले होते. रणवीर म्हणाला होता, “जेव्हा एखादी व्यक्ती मंदिरात जाते तेव्हा त्यांना प्रसाद म्हणून लाडू किंवा शिरा हवा आहे का, असं ते कधीच विचारत नाहीत. तिथे जे काही मिळेल ते प्रसाद म्हणून घेतात. थोडक्यात, देव रणवीर आणि दीपिकाला जे काही आशीर्वादानं देईल त्यात तो आनंदी असेल, असा त्याचा अर्थ होता. रणवीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
दरम्यान, दीपिका पदुकोणच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर दीपिका नुकतीच ‘फायटर’मध्ये झळकली होती. ‘सिंघम अगेन’ या आगामी चित्रपटातदेखील दीपिका दिसणार आहे. १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटात दीपिका, प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दिशा पटानी अशा कलाकारांबरोबर दिसणार आहे.