मराठी रंगभूमी म्हटलं की, डोळ्यांसमोर अनेक दिग्गज कलाकारांचे चेहरे येतात. मराठी रंगभूमीने मनोरंजन विश्वाला अनेक मातब्बर कलाकार दिले. अशाच कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेते दिलीप प्रभावळकर. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने तर जिंकलीच. पण, आपल्या लेखणीतून त्यांनी अनेक नाटकांची कल्पनाही कागदावर उतरवली. दिलीप प्रभावळकर यांनी अनेक नाटकांच्या लेखनाची बाजूही उत्तम प्रकारे सांभाळली. आता पुन्हा एकदा ते आपल्या नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या मराठी मनोरंजन विश्वात या नाटकाची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री अक्षया नाईक या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आपल्या दमदार अभिनयाने हिंदी मालिकांनंतर आता मराठीतही अभिनेत्री अक्षय नाईक हिने आपला दबदबा निर्माण केला आहे. अभिनेत्री अक्षया नाईक हिने छोट्या पडद्यावरच्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून मराठी टीव्ही विश्वात पदार्पण केलं होतं. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता अक्षया मराठी रंगभूमीवर एन्ट्री घेण्यास सज्ज झाली आही. अक्षया नाईक आगामी मराठी नाटकात मुख्य भूमिका साकरताना दिसणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर लिखित या आगामी मराठी नाटकाची निर्मिती भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. या नाटकातील अक्षयाचा लूक कसा असणार आहे, याची झलक नुकतीच सोशल मीडियावर दाखवण्यात आली आहे. अक्षयाने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये ती एका वयस्कर महिलेच्या भूमिकेत दिसत असून ती आरशासमोर तयार होत असते. टिकली लावून, कानाला मफलर बांधून तयार झाल्यावर ती आरशात बघून स्वत:कडेच कौतुकाने बघते. त्यानंतर नवऱ्याला हाक मारते आणि त्यांच्यामुळे कसा सगळीकडे जायला उशीर होतो यावरुन टोमणाही मारते. या ब्लॅक अँड व्हाइट प्रोमोमध्ये एकटी अक्षयाच दिसते आहे. दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेलं हे नाटक या आधी देखील काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं होतं. त्यावेळी त्यांच्या या नाटकाचं प्रेक्षकांनी खूप कौतुकही केलं होतं. या नाटकाला आता साधारणतः पंचवीस वर्षे उलटून गेली आहे. मात्र, अतिशय हलकाफुलका आशय असलेले हे नाटक आजही प्रेक्षकांना तितकेच आवडत आहे. या नाटकाला सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत दिलं आहे.
दिलीप प्रभावळकर यांच्या या नाटकातून अक्षयाला रंगभूमीवर अभिनय करताना पाहण्यासाठी आता सगळेच उत्सुक झाले आहेत. पहिल्याच मालिकेत आव्हानात्मक भूमिका साकारून अक्षयाने आपली अभिनय क्षमता दाखवून दिली होती. आता अक्षया स्वतः देखील या नव्या प्रयोगासाठी खूप उत्सुक आहे. या नाटकात अक्षया नाईकसोबत आणखी कोणते कलाकार दिसणार? या नाटकाचे नाव काय असणार? याची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.