सोनी लिव्ह रोमांचक क्राइम थ्रिलर सिरीज ‘मानवत मर्डर्स' घेऊन येत आहे. ही सिरीज सर्वात भयानक ऐतिहासिक घटनेचा उलगडा करते, जिने ७०च्या दशकात देशाला हादरून टाकले. आशिष बेंडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिरीजमध्ये प्रतिष्ठित कलाकारांसह आशुतोष गोवारीकर आहेत, जे या सिरीजमध्ये भारताचे शेरलॉक होम्स म्हणून ओळखले जाणारे प्रतिष्ठित सीआयडी डिटेक्टिव्ह ऑफिसर रमाकांत एस. कुलकर्णी यांची भूमिका साकारणार आहेत. या रोमांचक सिरीजमध्ये गोवारीकर अद्वितीय भूमिका साकारणार आहेत, जे शांत व संयमी असण्यासोबत समजूतदार देखील आहे. ते साकारत असलेल्या भूमिकेमधून इतिहासातील सर्वात गुंतागुंतीच्या केसचा उलगडा करण्यासाठी आवश्यक असलेली अविरत कटिबद्धता, चिकाटी व कौशल्यांना पाहायला मिळेल. तसेच, या सिरीजमध्ये १९७०च्या दशकात ग्रामीण महाराष्ट्रातील गूढ हत्यांच्या मालिकेचा उलगडा करण्याचे त्यांचे प्रयत्न पाहायला मिळतील. या पाठलागादरम्यान ते काळाच्या विरोधात जातात.
रमाकांत एस. कुलकर्णीची भूमिका साकारण्याबात आशुतोष गोवारीकर म्हणाले, “आज मुंबई सीआयडीचे पोलिस अधिकारी श्री. रमाकांत एस. कुलकर्णी यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान मानतो. त्यांनी अनेक केसेस सोडवल्या, ज्यांचा अन्यथा उलगडा झाला नसता. यामध्ये कुप्रसिद्ध मानवत मर्डर्सचा देखील समावेश आहे. ते भारताचे शेरलॉक होम्स म्हणून ओळखले जायचे. त्यांचे आत्मचरित्र ‘फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम'मध्ये या हत्याकांडामधील संपूर्ण प्रक्रिया, त्यांनी बारकाईने घेतलेला शोध, संशयित व्यक्तींसंदर्भात केलेली हाताळणी, त्यांना गुन्ह्याची कबूली देण्यास भाग पाडलेली स्थिती अशा अद्भुत बाबींची माहिती आहे, तसेच ‘सत्यापलीकडे सत्याचा शोध' यावरील त्यांचा विश्वास देखील दिसून येतो.'' आपल्या सह-कलाकारांबाबत सांगताना ते पुढे म्हणाले, “या सिरीजचा आणखी एक उत्साहवर्धक पैलू म्हणजे मी खूप वर्षांनंतर मकरंद अनासपुरेसोबत काम केले (१९९८ मध्ये चित्रपट ‘सरकारनामा') आणि माझ्या दोन आवडत्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व सई ताम्हणकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे अभिनयाचे नवीन धडे मिळवण्यासारखे होते. मला दिग्दर्शक आशिष बेंडे यांच्यासोबत काम करण्याचा देखील आनंद झाला आहे, ज्यांना ही कथा, शैली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या भूमिकेबाबत सखोलपणे माहित होते.'' रमाकांत एस. कुलकर्णी यांच्या कुटुंबाला भेटण्याबात ते पुढे म्हणाले, “मी रमाकांत कुलकर्णी यांच्या पत्नी, त्यांची मुलगी अनिता भोगले आणि अनिताजींचे पती हर्षा भोगलेजी यांना भेटलो. त्यांच्याकडून रमाकांत यांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, वागणूक, विश्वास, वैयक्तिक जीवन अशा अनेक गोष्टींबाबत जाणून घेतले. या माहितीमुळे मला या भूमिकेसाठी माझ्या स्वत:च्या विनम्र पद्धतीने तयारी करण्यास मदत झाली. रमाकांतजींचा वारसा प्रेरणादायी व सखोल आहे आणि मी आशा करतो की, या सिरीजच्या माध्यमातून विविध केसेसचा उलगडा करण्याच्या त्यांच्या उल्लेखनीय कामाकरिता त्यांना मान्यता व सन्मान मिळेल, ज्यासाठी ते पात्र आहेत.''
टीझर लिंक: https://www.instagram.com/reel/C_dO1UgIpLo/?igsh=MW5iNnN4eW84ajI5cA==
स्टोरीटेलर्स नूक (महेश कोठारे व आदिनाथ कोठारे) निर्मित आणि गिरीश जोशी यांची निर्मिती असलेली सिरीज ‘मानवत मर्डर्स'चे दिग्दर्शक आशिष बेंडे आहेत. रमाकांत एस. कुलकर्णी यांची आत्मचरित्रात्मक कलाकृती ‘फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम'वर आधारित या सिरीजमध्ये आशुतोष गोवारिकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर असे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.