Close

10 वर्षांनी लहान दिसण्यासाठी असा करा मेकअप (Do This Makeup To Look 10 Years Younger 2)

निसर्गाच्या विरोधात आपण काही करू शकत नाही. त्याच्या नियमाप्रमाणे वय वाढलं की त्याच्या खुणा दिसायच्याच. पण आपण मनानं आणि मेकअपनं स्वतःला कायम लहान ठेवू शकतो.


आपण नेहमी असं ऐकत असतो की मुलींना एका ठराविक वयानंतर आपलं खरं वय सांगायला आवडत नाही. पण कधीकधी ज्या गोष्टी आपण लपवू इच्छितो त्या नैसर्गिकरित्या दिसू लागतातच. म्हणजेच वयपरत्वे चेहर्‍यावरील खुणा आपलं अस्तित्व दाखवतातच. ह्या खुणा पूर्णपणे मिटवता आल्या नाहीत तरी लपवता मात्र नक्कीच येतात. मेकअप करताना काही विशिष्ट गोष्टी ध्यानात ठेवल्या तर आपण आपल्या वयापेक्षा 10 वर्षांनी लहान दिसू शकतो. खरं वाटत नसेल तर या मेकअप टीप्स जरूर आजमावून पाहा.

मेकअप बेस कसा हवा?

  1. मेकअपच्या सुरुवातीला चेहर्‍यास मॉयश्चरायजर लावा.
  2. मेकअप करताना प्रायमरचा वापर विचारपूर्वक करा. तरुण दिसायचं असेल तर पावडर बेसचा प्रायमर वापरू नका, यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या दिसतात. त्याऐवजी मॉयश्चरायजर बेस्ड प्रायमर वापरल्यामुळे सुरकुत्या कमी प्रमाणात दिसतात. तुमची त्वचा तेलकट असेल तर जेल बेस्ड प्रायमर लावा.
  3. तरुण दिसायचं असेल तर कन्सीलर अतिशय गरजेचं आहे. वय वाढते तसे डोळ्यांच्या खाली आणि नाकाच्या आजूबाजूला त्वचेवर डाग दिसू लागतात. कन्सीलर लावून अशाप्रकारचे डाग सहज लपविता येतात. परंतु, कन्सीलर लावताना लक्षात ठेवा की कन्सीलर फक्त डाग असलेल्या जागीच लावावे, संपूर्ण चेहर्‍यास कन्सीलर लागले तर आहे तो लूकही बिघडेल. आणखी एक लक्षात घ्या की कन्सीलरचा रंग आपल्या त्वचेच्या रंगाशी मिळताजुळता असला पाहिजे. डागाळलेल्या जागीही जास्त कन्सीलर लावू नका.
  4. आपल्या त्वचेला मॅच होईल असं फाउंडेशन आणि फेस पावडर लावा. गोरं दिसण्यासाठी आपल्या स्किन टोनपेक्षा लाइट फाउंडेशन लावू नका. त्यामुळे तुमचं सौंदर्य खुलून दिसण्यापेक्षा अधिक बिघडेल. असं झाल्यास करेक्शनसाठी तुम्ही फाउंडेशनच्या दोन शेड्सचा वापर करू शकता. जसे - तुमचा चेहरा रुंद आहे तर चेहर्‍याच्या बाहेरच्या भागात डार्क शेडचे फाउंडेशन वापरा आणि जे फिचर्स उठून दिसावेत असे वाटते त्यांना लाइट शेड वापरा.
  5. काही मिनिटांत तरुण दिसायचं असेल तर नॉर्मल फाउंडेशन ऐवजी थ्री इन वन फाउंडेशनचा वापर करा. यामुळे चेहर्‍यावर मेकअपचा थर कमी प्रमाणात दिसेल आणि तुम्ही अधिक तरुण आणि फ्रेश दिसाल.
  6. हायलायटरच्या मदतीने तुम्ही चेहर्‍यास स्लिम भासवू शकता. यासाठी भुवयांमध्ये हायलायटचा वापर करा. नंतर नाकावर, अप लिप्सच्या वर आणि हनुवटीच्या मधल्या जागी हायलायटर लावा.
  7. तुमची हनुवटी फॅटी आणि गुबगुबीत आहे तर जॉ लाइनवर ब्रॉन्जर लावा. ब्रॉन्जर वापरताना ते व्यवस्थित ब्लेंड करा, त्यामुळे जॉ लाइनच्या जवळ असलेल्या स्ट्राइप्स दिसणार नाहीत.

    डोळ्यांचा मेकअप असा करा…
  8. डोळ्यांचा मेकअप लाइट असावा म्हणजेच आपले ओठ आणि डोळ्यांचा मेकअप यामध्ये दोन शेडचा फरक असला पाहिजे.
  9. तुमच्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असतील तर डोळ्यांना हायलाइट करू नका.
  10. भुवया जास्त हायलाइट करू नका, नाहीतर तुम्ही आर्टिफिशियल दिसाल.
  11. डोळ्यांचा प्रायमर वापरा, यामुळे फाइन लाइन्स स्मूद होतात. त्यानंतर तु्म्ही लाइट शेडच्या आयशॅडो लावा.
  12. डोळ्यांचा मेकअप करताना डार्क रंगांचा वापर करू नका. शिमरी आयशॅडोही लावू नका, यामुळे सुरकुत्या आणि फाइन लाइन्स अधिक उठून दिसतात.
  13. ब्लॅक आयलायनरऐवजी ब्राऊन वापरा. हा रंग यंग लूक देतो.
  14. गरजेपेक्षा जास्त मस्कारा लावू नका. त्यामुळे डोळ्यांकडे प्रत्येकाची नजर जाते आणि तेथील सुरकुत्याही दिसून येतात. तसेच लोअर लिडवर मस्कारा लावल्यास तुमचं वय दिसून येतं.
  15. काजळ लावून डोळ्यांचा मेकअप पूर्ण करा.
  16. डोळे लहान आहेत आणि काजळ लावूनही सुंदर दिसत नाहीत, असं असेल तर तुम्ही सफेद रंगाची आय पेन्सिल वापरा. यामुळे तुमचे डोळे मोठे भासतील. तसेच तुम्ही बारीक आयलायनर लावा. त्यामुळे तुमचे डोळे मोठे आणि नजरही
    सुंदर दिसेल.

    ब्लश कसं वापरायचं?
  17. ब्लशचा वापर करताना आधी आपल्या स्किन टोनवर लक्ष द्या.
  18. वय जास्त झालं असलेल्यानी जास्त ब्लश लावण्याची चूक करू नका.
  19. ब्लश लावण्यापूर्वी चेहर्‍यावर मॅट फाउंडेशन अवश्य लावा.
  20. क्रीमी ब्लशला हातच लावू नका. त्याने चेहर्‍यावरील सुरकुत्या दिसून येतात. त्याऐवजी पावडर बेस्ड ब्लश वापरणे उत्तम.
  21. शायनी ब्लश वापरण्याची चूकही करायची नाही. चेहर्‍यावरील सुरकु्त्या लपवण्यासाठी मॅट किंवा सेमी-मॅच ब्लश वापरा.
  22. तरुण दिसण्यासाठी पिंक, पीच अशा लाइट शेडचे ब्लश वापरा.
  23. तुमचे चीक बोन्स वर असतील आणि थोडं जरी ब्लश लावलं तरी ते जास्त हायलाइट होत असतील तर तुम्हाला सौम्य मेकअप करायला हवा. पिंक, पीच यांसारख्या लाइट रंगाचा ब्लश लावावयास हवा. तसेच तुमचे चिक बोन्स झाकले जातील अशी केशरचना तुम्ही केली पाहिजे.

    लिप मेकअप करायचाय?
  24. ओठ सुंदर दिसण्यासाठी फ्रेश आणि ब्राइट शेड्सच्या लिपस्टिक वापरा. डार्क कलरची लिपस्टिक वापरू नका, त्यामुळे तुम्ही वयस्कर दिसाल.
  25. ओठांसाठी कोरल, ऑरेंज, पिंक इत्यादी रंगांचा वापर करा. या रंगांमुळे तुम्ही 8-10 वर्षांनी लहान दिसाल.
  26. कोरल आणि ऑरेंज यांसारखे न्युट्रल रंग प्रत्येकावर खुलून दिसतात. मोहक आणि अभिजात सौंदर्य हवं असणार्‍या महिला अशा शेड्स वापरु शकतात. कॅज्युअल आणि फॉर्मल अशा दोन्ही प्रसंगी हे रंग सूट होतात.
  27. न्यूड आणि मॅट फिनिशिंगच्या शेड्स वापरल्याने ओठ गॉडी वाटत नाहीत. या लिपस्टिक शेड्स कोणत्याही वयाच्या महिलांना सूट करतात. गोरी, सावळी, काळी अशा कोणत्याही वर्णाची स्त्री या शेड्सच्या लिपस्टिक
    वापरु शकते.
  28. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेस वापरता येण्याजोगी पेस्टल शेडची लिपस्टिक जरूर वापरा आणि तरुण दिसा.
  29. तरुण आणि टवटवीत दिसण्यासाठी तुम्ही फक्त लिप ग्लॉस लावलं तरी चालेल.
  30. तुमचे ओठ मोठे आहेत, मग मॅट लिपस्टिक लावा. पण ही लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप पेन्सिलने ओठांना थोड्या आतल्या बाजूने आउटलाइन करा. मग लिपस्टिक लावा.
    मग अजूनही आपल्याकडे वेळ आहे तरुण आणि लहान दिसण्यासाठी. तेव्हा ही संधी मुळीच वाया जाऊ देऊ नका.

Share this article