Close

‘जवान’मधील कथा खऱ्या आयुष्यातील घटनेवर आधारित? (Dr Kafeel Khan Said Thank You To Shah Rukh Khan Atlee For Sanya Malhotra Jawan Character २०१७ Gorakhpur Tragedy)

दमदार कथा, उत्तम अभिनय आणि तगडी स्टारकास्ट असलेला शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत कमाईचा २०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अटली दिग्दर्शित या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. आता ‘जवान’मधील कथा ही खऱ्या आयुष्यातील घटनेवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे.

ज्यांनी जवान हा चित्रपट पाहिला आहे, त्यांना सान्या मल्होत्राच्या भूमिकेविषयी चांगलीच माहीत असेल. ती या चित्रपटात डॉक्टरच्या भूमिकेत आहे, जी एक सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करते. मात्र याप्रकरणी ६३ मुलांचा मृत्यू होतो. यानंतर ड्युटीमधील निष्काळजीपणाचा आरोप करत तिला अटक केली जाते आणि तिला तुरुंगात पाठवलं जातं. अटलीने २०१७ मध्ये गोरखपूर रुग्णालय दुर्घटनेतील डॉ. कफील खानसोबत घडलेली घटना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच कफील यांनी दिग्दर्शक आणि अभिनेत्याचे आभार मानले आहेत.

डॉ. कफील खान यांनी मानले शाहरुखचे आभार

शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटात शेतकऱ्यांवरील कर्जाच्या व्याजापासून ते सरकारी रुग्णालयांच्या दयनीय स्थितीपर्यंत बऱ्याच गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. याशिवाय भोपाळ गॅस दुर्घटना आणि निवडणुकीदरम्यान झालेली हेराफेरी या गोष्टीही चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. डॉक्टर कफील खान यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यांच्यासोबत घडलेल्या घटना चित्रपटात दाखवल्याबद्दल त्यांनी निर्मातांचे आभार मानले. आपण हा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, मात्र तो प्रदर्शित झाल्यापासून मला खूप जणांकडून शुभेच्छा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.

कफील यांनी पुढे लिहिलं, ‘चित्रपट आणि वास्तविक जीवन यात खूप फरक असतो. ‘जवान’मध्ये गुन्हेगार स्वास्थ्यमंत्र्यांना शिक्षा दिली जाते. पण इथे मला आणि त्या ८१ कुटुंबीयांना आजही न्यायासाठी संघर्ष करावा लागतोय. शाहरुख आणि अटली सर मी तुमचे आभार मानतो, की यासारखी सामाजिक समस्या तुम्ही चित्रपटात मांडली.’ यासोबतच कफील यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की चित्रपटातील इरमची भूमिका ही त्यांच्याशी मिळतीजुळती आहे. खऱ्या आयुष्यातही त्यांना बऱ्याच समस्या आणि छळाचा सामना करावा लागला.

(फोटो सौजन्य - ट्टविटर)

गोरखपूर रुग्णालय दुर्घटना

कफील हे डॉक्टर आणि गोरखपुरच्या बाबा राघवदास मेडिकल कॉलेजचे माजी लेक्चरर आहेत. थकबाकी न भरल्याने शासकीय रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याचं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यावर त्यांनी स्वखर्चाने तो पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दरम्यान ॲक्युट इंसेफलाइटिस सिंड्रोममुळे ६३ मुलांचा मृत्यू झाला होता. यानंतर उत्तर प्रदेश सरकारने ऑक्सिजन पुरवठ्याचा अभाव असल्याचं कारण नाकारलं आणि त्याऐवजी डॉक्टर कफील यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवलं. अशीच काहीशी कथा जवान या चित्रपटात दाखवण्यात आली आहे

Share this article