Close

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान! (Dr. Mohan Agashe Punyabhushan Award)

नुकताच पुण्यात ‘पुण्यभूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे दर वर्षी हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार आपल्या दमदार अभिनयाने मराठीच नव्हे, हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या डॉ. मोहन आगाशे यांना प्रदान करण्यात आला. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री श्रमिला टागोर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘पुण्यभूषण’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘पुण्यात आज माझा हा सन्मान होत आहे याचा मला अधिक आनंद आहे. या शहराने मला खूप सांभाळून घेतले आहे. हा पुण्यभूषण पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. मी म्हणेन की यासाठी मी एकट्याने काहीच केलेले नाही, जे काही केले ते माझ्यासोबत अनेकांनी मिळून केले. त्यामुळे हा पुरस्कार माझ्या एकट्यासाठी नाहीये. वैद्यकशास्त्राने विचार शिकवला आणि कलेने मला भावनांचा आदर करायला शिकवले. या दोन्हीचा वापर करून आयुष्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला.’

याप्रसंगी पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, ‘‘रत्नांच्या खाणीतून पुण्यभूषण पुरस्कारासाठी एक रत्न निवडण्याचे काम अतिशय कठीण आहे. पुण्यभूषण पुरस्कार स्वीकारून डॉ. आगाशे यांनी आमचाच सन्मान केला आहे.’’ तर शर्मिला टागोर म्हणाल्या, ‘‘डॉ. आगाशे आणि माझी ४० वर्षांपासून मैत्री आहे. आमच्या कारकिर्दीत अनेक साम्यस्थळेही आहेत. मुख्य धारेतील व्यावसायिक चित्रपट आणि समांतर चित्रपटांमधील सीमारेषा पुसण्याचे महत्त्वाचे काम डॉ. मोहन आगाशे यांनी केले आहे.’’

Share this article