बाप आणि लेक यांच्यातील नाजूक आणि गुंतागुंतीच्या नात्याचा वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर काल १६ जून रोजी फादर्स डे च्या निमित्ताने प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधून चित्रपटात वडील आणि मुलीमधील भावनिक नातं पाहावयास मिळणार आहे, असे लक्षात येते. दीर्घ काळानंतर अभिनेते सतीश पुळेकर द्विधा या चित्रपटामध्ये काम करणार आहेत.
निलेश नाईक हे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक असून आपले दिग्दर्शन करण्याचे स्वप्न द्विधाच्या निमित्ताने पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने सतीश पुळेकर यांसारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. विदुला नाईक यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपटात सतीश पुळेकर यांच्यासोबत अभिनेत्री मानसी कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नेटफ्लिक्स आणि इतर अनेक चित्रपट, वेब सिरीजसाठी आपलं संगीत देणारे निलोत्पल बोरा यांनी चित्रपटास संगीतबद्ध केले असून मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले आहे.
चित्रपटाचा विषय लक्षात घेता प्रेक्षकांना चित्रपटाचा भावनिक प्रवास आवडेल अशी आशा निर्माता – दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे. शिवाय टीझरमुळे वडील आणि मुलीमधील चिरस्थायी प्रेम आणि हळवे संबंध पाहावयास मिळण्याची उत्कंठाही निर्माण झाली आहे.