काही सोप्या कसरती नि छोट्या सवयी आपल्या व्यस्त जीवनशैलीत फिट राहण्यासाठी.
तंदुरूस्त राहणं गरजेचं असलं तरी त्यासाठी कराव्या लागणार्या व्यायामासाठी आपल्या बिझी लाईफस्टाईलमध्ये बिलकुल वेळ नसतो. त्यावर उपाय म्हणजे ऑफिसमध्ये खुर्चीत बसल्या बसल्या तुम्ही काही सोप्या कसरती करू शकता.
आपल्या टेबलाकडे पाठ करून उभे रहा. दोन्ही हात टेबलावर ठेवा आणि गुडघ्यातून पाय दुमडत खाली जाण्याचा प्रयत्न करा नि परत वर या. असे 10 ते 15 वेळा करा.
टेबलाकडे तोंड करून सरळ उभे रहा. दोन्ही हात उलटे स्वतःकडे करा. हातांवर हलका जोर देत खाली वागा. 15 सेकंद या अवस्थेत राहिल्यानंतर सरळ व्हा.
भिंतीकडे पाठ करून उभे रहा. पाय दुमडत खाली जाण्याचा प्रयत्न करा. 1-2 मिनिटांनी पूर्वावस्थेत या. यामुळे कॅलरीज् लवकर बर्न होतात.
खुर्चीवर बसण्याची कल्पना करा आणि त्याप्रमाणे खाली बसा नि उठा. असे 5 वेळा करा.
खुर्चीवर बसल्या बसल्याच पाय सरळ पसरा नि दुमडा. असे 15 वेळा करा.
खुर्चीला चाकं असल्यास खुर्ची काही वेळ लहान मुलांप्रमाणे इकडे तिकडे हलवा. त्यामुळे पूर्ण शरीराला हलकं वाटेल. बसून बसून आखडलेलं शरीर मोकळं होईल.
डेस्क एक्सरसाइज
खुर्चीत बसलेल्या स्थितीतच दोन्ही पाय सरळ पसरा नि पायाची बोटं पकडण्याचा प्रयत्न करा.
उजवा पाय सरळ पसरा नि दुमडा. ही क्रिया 15 वेळा केल्यानंतर मग डाव्या पायाने करा.
पाण्यात सूर मारताना आपण जसे हात, मान, डोके थोडे मागे नेतो तसे संपूर्ण शरीर ताणून द्या.
बसल्या बसल्याच उजवा हात कोपरात दुमडून डाव्या खांद्याच्या मागे ठेवा. थोड्या वेळाने हीच क्रिया विरूद्ध बाजूने करा.
दोन्ही हात खुर्चीच्या मागच्या बाजूला पसरा. थोडासा हलका ताण द्या नि त्याचवेळी मान वर करून छताकडे बघा.
उजव्या पायावर डावा पाय क्रॉस करून ठेवा नि पाठ डाव्या बाजूला मोडा. असेच दुसर्या बाजूने ही करा.
दोन्ही हात डोक्यावर ठेऊन पहिल्यांदा उजवीकडे मग डावीकडे झुका. असे 5 वेळा करा.
फिटनेस टिप्स
सारखे इंटरकॉम वर बोलण्यापेक्षा ज्याच्याशी बोलायचे आहे त्याच्या टेबलापाशी जा नि बोला.
ऑफिसमध्ये जाताना एलिव्हेटर किंवा लिफ्टचा वापर करण्याऐवजी जिन्याने जा.
नेहमी खुर्चीवर बसूनच काम करू नका. काही कमी वेळात होणारी कामं तुम्ही उभं राहून देखील करू शकता. यामुळे जाडेपणा, मधुमेह होण्याची संभावना कमी होते.
मोबाईलवर बोलताना नेहमी बसून न बोलता कधी फिरता फिरता बोला. त्यामुळे थोडासा वॉक पण होतो.
खाण्या-पिण्यासाठी काही हवे असल्यास वारंवार ऑफिस बॉयला न सांगता स्वतः उठून पॅन्ट्रीमध्ये जाऊन घ्यावे. त्यामुळे पाय मोकळे होतील नि तुम्हाला ही फ्रेश वाटेल.
लंच ब्रेकमध्ये बसून गप्पा मारण्यापेक्षा थोडा वेळ बाहेर फिरून या.
कॉम्प्युटरवर काम करताना आपल्या बसण्याच्या स्थितीवर लक्ष असू द्या. म्हणजे पोक काढून किंवा पुढे झुकून तर बसलो नाही ना, यावर लक्ष असू द्या.
दीर्घ श्वसन केल्याने मोकळे वाटते. त्यामुळे काम झाल्यानंतर दीर्घ श्वसनाची 1-2 आवर्तनं करा.
डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी पामिंग करा. म्हणजेच दोन्ही हातांचे एकमेकांवर घर्षण करा व ते डोळ्यांवर ठेवा. हाताची ऊब डोळ्यांना मिळाल्याने डोळ्यांना विश्रांती मिळते.
संतुलित आहार महत्त्वाचा
भरपूर पाणी प्या.
दुपारच्या जेवणानंतर मधल्या वेळी लागणारी भूक शमवण्यासाठी चणेे, कुरमुरे, मूगडाळ, मोड आलेली उकडलेली कडधान्ये हे चांगले आणि हेल्दी पर्याय आहेत.
खूप जास्त तेलकट व तिखट अन्नपदार्थ खाणे टाळा.
रोज जेवणासोबत सलाड देखील खा. फायबरयुक्त सलाड पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते.
दिवसभरात 2 ते 3 कपांपेक्षा अधिक चहा/कॉफी आरोग्यासाठी चांगली नाही.
दुपार व रात्रीचे जेवण वेळेत करा. हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
सुकामेव्याचा छोटा डबा नेहमी सोबत ठेवा. भूक लागल्यावर बाहेरचे जंक फूड, फास्ट फूड खाण्यापेक्षा सुकामेवा खाणे नेहमीच उत्तम.
त्याचबरोबर सोबत एखादे फळ ठेवा. भूक लागल्यास प्रवासात खाण्यासाठी अगदी उत्तम. त्यामुळे ऊर्जा मिळते नि शरीराचे पोषण देखील होते.
आहारात भाज्या व फळांची मात्रा अधिक असू द्या.
रोज 7-8 तास शांत झोप घ्या.