बॉलिवूडमध्ये अनेक नामवंत कलाकार, गायक आहेत. पण काही गायक असे आहेत जे फक्त गाणी म्हणत नाहीत तर त्यांचा आवाज लोकांच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत पोहोचतो. त्यांच्या गाण्यांमध्ये, आवाजामध्ये समोरच्याला मंत्रमुग्ध करण्याची ताकद असते. अशीच एक गायिका आहे जिने हिंदी चित्रपटसृष्टीवर तिच्या आवाजाने राज्य केलं आहे. गेल्या अनेक दशकांपासून ती गात असली तरी आजही तिचा आवाज लोकांमध्ये तेवढाच लोकप्रिय आहे. त्या गायिकेचं नाव आहे अलका याज्ञिक. आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांना गुगंवून ठेवणाऱ्या अलका याज्ञिक या सोशल मीडियावरही बऱ्याच ॲक्टिव्ह असतात आणि त्यांच्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या पोस्ट्स शेअर करत असतात. त्यावर चाहत्यांचे लाईक्स आणि कमेंट्सही येतात.
मात्र नुकतीच अलका याज्ञिक यांनी जी पोस्ट शेअर केली ती वाचून मात्र त्यांचे चाहते काळजीत पडले आहेत. त्यामागचं कारणंही तसंच आहे. अलका याज्ञिक यांना एक दुर्मिळ न्यूरो डिसऑर्डर (आजार) झाला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे चाहत्यांना चिंता वाटू लागली आहे. ‘एके दिवशी मी फ्लाइटमधून बाहेर पडले आणि माझ्या लक्षात आलं की मला काहीच ऐकू येत नाहीये. एका व्हायरल ॲटॅकमुळे त्यांना हा त्रास जाणवू लागला. ‘त्यांच्या या पोस्टनंतर त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना सुरू केली आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनाही या बातमीमुळे मोठा धक्का बसला आहे.
अलका याज्ञिक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘माझे सर्व मित्र, चाहते आणि शुभचिंतक यांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते. काही आठवड्यांपूर्वी, मी फ्लाइटमधून बाहेर पडताच मला अचानक जाणवलं की मला काहीही ऐकू येत नाही. बरेच लोक मला विचारत होते की मी इतके दिवस शांत का होते? अनेक आठवड्यानंतर खूप हिम्मत करून मी तुमच्यासमोर सांगत आहे. यानंतर मी तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेले. हा एक दुर्मिळ आजार असून सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस असं त्याला म्हणतात. हा एका व्हायरल ॲटॅकमुळे झाला आहे. अचानक घडलेल्या या गोष्टीमुळे मला मोठा धक्का बसला आहे. मात्र ही गोष्ट स्वीकारण्याचा मी प्रयत्न करत आहे. कृपया तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा.’ असे त्यांनी पोस्टमध्ये लिहीलं आहे.

याचवेळी अलका याज्ञिक यांनी त्यांच्या चाहत्यांना आणि इतर सहगायकांना एक महत्त्वाचा सल्लाही दिला. ‘अत्यंत मोठ्या आवाजातील संगीत आणि हेडफोन्सबद्दल मी इशारा देऊ इच्छिते. मोठ्याने हेडफोनवर गाणी ऐकणं टाळा असे आवाहनही त्यांनी केले. माझ्या प्रोफेशनमुळे आरोग्याला होणाऱ्या हानीबद्दल एखाद्या दिवशी मी नक्कीच बोलेन. तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे माझं आयुष्य पुन्हा रुळावर येईल आणि मी तुम्हा सर्वांना लवकरच पुन्हा भेटेन अशी आशा बाळगते. या कठीण काळात तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,’ असंही त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
अलका याग्निक यांच्या पोस्टमुळे त्यांच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे. तसेच गायक सोनू निगम, गायिका-अभिनेत्री इला अरूण यांसारख्या चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही काळजी व्यक्त करत अलका यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.