सध्या मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्यांसोबतच सोशल मीडियावरच्या कंटेन्ट क्रिएटर्सचाही बोलबाला आहे. नुकतंच चित्रपटांसाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांप्रमाणेच इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्युबरवर काम करणाऱ्या कंटेन्ट क्रिएटर्सना देखील राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा मुलगा आणि सून देखील प्रसिद्ध युट्यूबर असून त्यांना नुकतंच ‘प्रतिभावान युट्यूबर’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. या अभिनेत्रीनं इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या मुलाचं आणि सुनेचं कौतुक केलं आहे.
ही अभिनेत्री आहे अनुराधा राजाध्यक्ष. हिंदी व मराठी कलाविश्वातील या प्रसिद्ध अभिनेत्री असून अभिराज म्हणजेच अभि हा त्यांचा लेक अन् नियती म्हणजेच नियू ही त्यांची सून आहे. नुकतेच या जोडप्याचा ‘प्रतिभावान युट्यूबर’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देऊन पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हे दोघं देशातील आघाडीच्या सोशल मीडिया क्रिएटर्सपैकी एक म्हणून ओळखले जातात. अभि अँड नियू एकत्र मिळून विविध विषयांची सखोल माहिती सर्वांना देत असतात.
युट्यूबर अभि आणि नियू म्हणजेच अभिराज आणि नियती राजाध्यक्ष हे खूप लोकप्रिय युट्यूबर आहेत. ते आपल्या चॅनेलवर पर्यावरण, सामाजिक, अध्यात्मिक, राजकरण अशा विविध विषयांवरचे व्हिडीओ हिंदी भाषेत पोस्ट करत असतात. अगदी अल्पावधीतच ‘अभि आणि नियू’ हे चॅनल लोकप्रिय झालं. कोरोना लॉकडाऊन नंतर त्यांनी सुरु केलेल्या चॅनलला लाखो व्ह्यूज मिळाले. सध्या त्यांचे 5.73 मिलियन फॉलोअर्स आहेत. प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करून ते प्रेक्षकांच्या समोर मांडत असतात. नुकतंच राष्ट्रीय पुरस्काराच्या रुपात त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे.
लेक व सुनेचा पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान झाल्यावर अनुराधा राजाध्यक्षांनी खास पोस्ट शेअर करत या दोघांचं कौतुक केलं आहे. “आई म्हणून आज तुम्हा दोघांचाही खूप खूप अभिमान वाटतोय. अभिमानास्पद कामगिरी…लव्ह यू अभिराज आणि नियती” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.