अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ही नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. मात्र नुकतीच तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. पूनमच्या मुंबईतील अपार्टमेंटला आग लागली आहे. या आगीत तिच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत तिची बेडरूम पूर्णपणे जळाली आहे. या आगीचे फोटो आणि व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सुदैवाने ज्यावेळी आग लागली, त्यावेळी पूनम घरात नव्हती. मात्र तिच्या घरात काम करणारी महिला आणि पाळीव श्वान हे यावेळी घरात होते. त्यांना वेळीच वाचवण्यात आले. ही आग लागली कशी, याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पूनम मुंबईतील एका इमारतीतील १६ व्या मजल्यावर राहते. तिच्या याच अपार्टमेंटमध्ये ही आग लागली. सोसायटीतील लोकांनी अग्निशमन विभागाला फोन केला. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.
सध्या पूनम तिच्या आगामी शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपुर्वी तिने मलायका अरोरा, सुनील ग्रोवर, सिद्धार्थ कन्नन आणि किकू शारदा यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते. पूनम पांडे ही तिच्या हॉट लूकसाठी ओळखली जाते. सध्या ती अनेक म्युझिक अल्बम प्रोजेक्टमध्ये दिसली आहे. पूनम शेवटची 'लॉकअप'मध्ये दिसली होती. या शोने तिला खूप प्रसिद्धी दिली होती.