सध्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कित्येक प्रीवेडींग फोटोशूट करताना जोडपी बघतो. पण सुपरहिट संगीतकार प्रशांत नाकतीने स्वतःच्या लग्नात एक नाही तर तब्बल ५ गाणी बनवली आहेत. त्याच्या लग्नाचं ५ गाण्यांनी सजलेलं 'लगीन सराई' हे मराठी गाणं प्रदर्शित झालं आहे. मराठी आणि हिंदी म्युझिक अल्बम इंडस्ट्रीतील असं हे पहिलंच गाणं आहे. ज्याचं चित्रीकरण खऱ्याखुऱ्या लग्नात पार पडलं. लगीन सराई या गाण्यात मेहंदी हाताला, हळदी अंगाला, दादूस सोय कर आपली, मंगलाष्टके आणि भावड्या अश्या ५ गाण्यांमध्ये प्रशांत नाकती आणि प्रिया नाकती यांच्या लग्नातील अविस्मरणीय क्षणांचा अनुभव आपल्याला घरबसल्या घेता येईल. सध्या सोशल मीडियावर हे गाणं प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
या गाण्याविषयी प्रशांत नाकती सांगतो, माझं लग्न फार घाईघाईत ठरलं त्यामुळे प्रीवेडींग फोटोशूटसाठी माझ्याकडे वेळ नव्हता. म्हणून मी आणि माझ्या टीमने लग्नासाठी नवं गाणं करण्याचं ठरवलं. लग्नाच्या ५ दिवस अगोदर मी प्रथेनुसार कुठेही जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी आणि संकेतने घरातल्या सेटअपवर गाणी कम्पोज केली. माझ्या जवळचे काही कलाकार मित्र आहेत. ते म्हणाले आम्हालाही लग्नाच्या गाण्यात दिसायचंय. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ही ५ वेगवेगळी गाणी करण्याचं ठरवलं."
पुढे तो ५ गाण्यांविषयी सांगतो, "'मेहंदी हाताला' आणि 'हळदी अंगाला' ही दोन गाणी गायिका 'सोनाली सोनावणे' हिने गायली आहेत तर 'दादूस सोय कर आपली' हे गाणं गायक 'परमेश माळी' याने गायलं आहे. मंगलाष्टके आणि भावड्या ही दोन्ही गाणी रवींद्र खोमणे याने गायली आहेत. या गाण्याची कोरिओग्राफी जयेश पाटील याने केली आहे. तर लग्नातील काही सीन्स प्रशांच्या राहत्या घरात चित्रीत झाले आहे. नीक शिंदे, रितेश कांबळे, तृप्ती राणे, सोनाली सोनावणे, असे २०० हून अधिक कलाकार प्रशांत आणि प्रिया नाकतीच्या लग्नाला उपस्थित होते."