गणपती बाप्पा घरी विराजमान होणार ही कल्पनाच सुखावून टाकणारी असते. त्याच्या सेवेत दिवस कसे निघून जातात हे कळतच नाही. कलाकार मंडळींसाठी शूटिंगचा सेट हा घरासमानच असतो. त्यामुळे सेटवरच्या या घरातही बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत होणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं, घरोघरी मातीच्या चुली, ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं आणि अबोली मालिकांचे विशेष भाग गणेशोत्सवात पाहायला मिळणार आहेत. ठरलं तर मग मालिकेत यंदा बाप्पाची प्रतिष्ठापना प्रतिमा, रवीराज आणि सायलीच्या हस्ते होणार आहे.
प्रतिमा घरी परत आल्यानंतर सुभेदार कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे या लाडक्या माहेरवाशिणीच्या हातून बाप्पाची स्थापना करण्याचं एकमताने ठरवलं गेलंय. योगायोगाने सायलीच्या हातून देखिल बाप्पाची पूजा होणार आहे. त्यामुळे आनंदाने भरलेला असा ठरलं तर मगचा गणेशोत्सव विशेष भाग असणार आहे. घरोघरीत मातीच्या चुली मालिकेतही विखेपाटील कुटुंब पारंपरिक पद्धतीने बाप्पाचं स्वागत करणार आहेत.
संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत सण साजरा करण्यासारखं दुसरं सुख नाही. घरोघरी मातीच्या चुली मालिकेतही संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत जल्लोष केला आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये यंदा सजावटीची जबाबदारी स्वीकारली आहे अधिराजने. योगायोगाने शिर्केपाटलांच्या वाड्याची हुबेहुब कलाकृती त्याने देखावा म्हणून रेखाटली आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतही मानसीने बाप्पाची सजावट केली आहे.
स्टार प्रवाहची अबोली मालिका म्हणजे चाळसंस्कृतीचं एक उत्तम उदाहरण. चाळीत ज्याप्रमाणे सगळी कुटुंब एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात अगदी तसंच अबोली मालिकेतही सगळे सण उत्साहात साजरे केले जातात. यंदाही गणरायाची स्थापना करुन अबोली मालिकेची संपूर्ण टीम बाप्पाची मनोभावे सेवा करणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाह मालिकांचे गणेशोत्सव विशेष भाग.