Close

मिळवा नैसर्गिक सौंदर्य (Get Natural Beauty)


सौंदर्य संवर्धनासाठी ब्युटी पार्लरमध्ये जायचे नसेल, तर काहीच हरकत नाही. कारण पार्लर तुमच्या घरी सहजच येऊ शकते.

सौंदर्य संवर्धनासाठी… सौंदर्य खुलविण्यासाठी ब्युटी पार्लर्सची मोठ्ठी मदत होते, यात वाद नाही. पण म्हणून ब्युटी पार्लरमध्ये जाऊनच… भरपूर नोटा मोजूनच सुंदर दिसता येते, असे मुळीच नाही. आपल्या घरातच आसपास एक नजर टाकली, तर तुमच्या त्वचेचे लाड पुरविणारे अनेक घटक सहजच तुमच्या नजरेस पडतील. मग अशा नैसर्गिक घटकांचा सौंदर्य संवर्धनासाठी नियमित वापर करून कमावलेल्या नैसर्गिक सौंदर्याची बात काही औरच असेल!
आपली त्वचाही आरोग्यदायी, नितळ आणि उजळ असावीअसे वाटत असेल, तर त्यासाठी त्वचेची नियमित व उत्तम काळजी घ्यायला हवी आणि सोबत या काही नियमांचा अवलंबही हवाच!

क्लींझिंग
त्वचेची निगा राखण्याची प्रथम पायरी आहे क्लींझिंग, अर्थात त्वचेची स्वच्छता.
त्वचा सदैव स्वच्छ ठेवण्यावर भर द्यायला हवा. तसेच प्रदूषण व धुळीपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी योग्य त्या दक्षताही घ्यायला हव्यात.
त्वचा स्वच्छ करायची म्हणजे, कोणताही साबण वापरून धुवायची आणि नंतर कापडाने रगडून पुसायची… ही पद्धत योग्य नाही.
योग्य परिणामांसाठी त्वचा कोमलतेने स्वच्छ करायला हवी.
यासाठी एका कापसाच्या बोळ्यावर थोडे गुलाबपाणी घेऊन संपूर्ण चेहर्‍यावर लावा.
यामुळे तुमचा चेहर्‍यावरील धूळ निघून जाईल, शिवाय चेहर्‍याला छान चमकही येईल.
चेहर्‍यासाठी चांगल्या दर्जाचा, सौम्य आणि
त्वचा आर्द्र राखणार्‍या साबणाची किंवा फेस वॉशची निवड करा.
तसेच चेहरा धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.
चेहर्‍यासाठी ग्लिसरीन बेस्ड साबणही उत्तम असतात.
तसेच क्लींझिंगचाच भाग म्हणून, चेहर्‍यावर मसाज करण्यासाठी क्रीम क्लींझर किंवा बेबी ऑईलचाही वापर करता येईल.

टोनिंग
टोनिंगची प्रक्रिया चांगल्या त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाची असते. टोनिंग केल्यामुळे क्लींझिंग करताना प्रसरण पावलेली त्वचेची छिद्रे पुन्हा पूर्ववत होतात. टोनर त्वचेमधील लवचिकता राखण्याकरिताही उपयुक्त ठरते. तसेच यामुळे त्वचा मुलायमही होते.
गुलाबाचा अर्क हा क्लींझर आणि टोनर म्हणून उत्तम कार्य करतो.
मुलतानी माती आणि गुलाबपाणी एकत्र करून, हा पॅक चेहर्‍यावर लावल्यास टोनिंगचा उत्तम परिणाम मिळतो.
कोमल व उजळ त्वचेसाठी या मिश्रणात थोडे ग्लिसरीन एकत्र करा.

मॉइश्‍चरायझिंग
प्रत्येक त्वचा प्रकाराला मॉइश्‍चरायझिंगची आवश्यकता असतेच असते. त्वचेवर सतत आघात करणारे प्रदूषण आणि तीव्र सूर्यप्रकाश यांचा विचार करता, तुमच्या त्वचेला निश्‍चितच नियमित मॉइश्‍चरायझिंगची आवश्यकता आहे.
त्वचेवरील ताण शिथिल करण्यासाठी नैसर्गिक मॉइश्‍चरायझर्सचा वापर करण्यावर भर द्या. त्यामुळे तुमची त्वचा आर्द्रही राहील आणि तिची चमकही वधारेल.
मॉइश्‍चरायझिंग हे केवळ बाहेरून नव्हे, तर शरीरातूनही व्हायला हवे. नारळ, शहाळे
हे त्वचेला आंतर्बाह्य मॉश्‍चराइज करण्यास उपयुक्त ठरतात. तसेच ते सौंदर्य आणि आरोग्यदृष्ट्याही महत्त्वाचे ठरतात.
शहाळ्याचे पाणी कापसाच्या बोळ्यावर घेऊन चेहर्‍यावर हळुवार लावा. हे एक उत्तम टोनरचे कार्य करते. तसेच त्वचेचा पोत सुधारून, उजळविण्यासही मदत करते.
नारळाचे तेलही उत्तम मॉइश्‍चरायझर आहे. ते त्वचा व केसांचे उत्तम पोषण करते. या तेलात अ‍ॅण्टी एजिंग गुणही आहेत.

नरिशिंग
त्वचा आरोग्यदायी, सतेज असावी असे वाटत असल्यास, तिचे योग्य पोषण होईल
या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.
मधामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमिनो अ‍ॅसिड्स मुबलक प्रमाणात असतात. अर्थातच मध त्वचेच्या पोषणास अतिशय मदत करते.
मध, लिंबू रस आणि दही एकत्र करून मिश्रण तयार करा. हा पॅक त्वचा स्वच्छ करण्यासाठी,
तसेच त्वचेच्या पोषणासाठी मदत करतो.
फळांचा पॅक तयार करण्यासाठी त्यात स्ट्रॉबेरी व मलई एकत्र करता येईल.
तसेच या मिश्रणात गव्हांकूर आणि ओटमिल किंवा बदामाची पूड एकत्र करून स्क्रबही तयार
करता येईल. या स्क्रबच्या वापरानंतर, टर्किशचा टॉवेल गरम पाण्यात बुडवून, पिळून चेहर्‍यावर ठेवा. यामुळे त्वचेमधील रक्ताभिसरण सुधारून त्वचेला छान चमक येईल.

एक्सफॉलिएटिंग
एक्सफॉलिएशनच्या प्रक्रियेमुळे त्वचेच्या वरच्या थरातली
मृत त्वचा पेशी निघून जातात आणि रक्ताभिसरणही सुधारते. तजेलदार, चमकदार त्वचेसाठी नियमित अंतराने त्वचेवरील मृत त्वचा पेशी काढून टाकणे आवश्यक आहे.
आपल्या त्वचा प्रकारानुसार योग्य साबणाची निवड करा.
आठवड्यातून एकदा चांगल्या दर्जाचा स्क्रब अवश्य वापरा.
तसेच मेकअप केला असल्यास, घरी आल्यावर चांगल्या दर्जाच्या मेकअप रीमुव्हरचा वापर करून,
तो अवश्य काढा. चेहर्‍यावर मेकअप तसाच ठेवून मुळीच झोपी जाऊ नका.

रीप्लेनिशिंग
त्वचेवरील मृत पेशी काढून टाकल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि ताजीतवानी होते. अशा त्वचेचे पुनर्निर्माण आणि पुनर्युवीकरण होण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक असते.
त्यासाठी सोयाबीनच्या पिठात किंवा बेसनामध्ये थोडे दूध एकत्र करून चेहर्‍यावर लावा आणि काही वेळाने चेहरा स्वच्छ करा.
मीठ, ग्लिसरीन आणि अरोमा ऑईलचे काही थेंब एकत्र करून चेहर्‍यावर लावा. या पॅकची अ‍ॅण्टी-बॅक्टेरियल आणि अ‍ॅण्टी फंगल गुणवैशिष्ट्ये त्वचेसाठी अतिशय परिणामकारक ठरतात. त्यानंतर चेहर्‍याला मॉइश्‍चरायझर लावायला मात्र विसरू नका.
यांचाही वापर करा!
लिंबू : त्वचेवरील रंध्र छिद्रे सहज उघडत असल्यामुळे अ‍ॅक्नेची समस्या जाणवत असल्यास किंवा तेलकट त्वचा प्रकारासाठी लिंबू अतिशय उपयुक्त आहे. नियमित वापराच्या क्लींझरचे कार्य लिंबू उत्तम रित्या करू शकतो. शिवाय पिवळी पडलेल्या नखांवर लिंबू चोळल्यास, ती पांढरी आणि चमकदार होतात. तसेच केस धुतल्यानंतर शेवटच्या पाण्यात लिंबाचा रस एकत्र करून केसांवर घातल्यास, केसांनाही छान चमक येते.


टी बॅग्स : डोळे लालसर, सुजलेले किंवा थकल्यासारखे जाणवत असल्यास, डोळे बंद करून त्यांवर वापरलेले (मात्र स्वच्छ धुतलेले) टी बॅग्स काही वेळासाठी ठेवा. डोळ्यांचा थकवा लगेच दूर होईल.
अळशी : ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचे हे उत्तम स्रोत आहे. म्हणूनच अळशीच्या वापराने त्वचा तरुण व उजळ दिसते.
मोड आलेली कडधान्ये : हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. यामुळे त्वचा आणि केस यांचा पोत सुधारतो.
नारळ पाणी : नारळाच्या पाण्यामुळे आपली शरीरांतर्गत प्रणाली थंड होते आणि आपल्याला आंतर्बाह्य ताजेतवाने वाटते.
पाणी : त्वचेसाठी पाणी अतिशय उपयुक्त आहे. चेहरा धूळमुक्त ठेवण्यासाठी दिवसभरातून 3-4 वेळा चेहरा केवळ पाण्याने धुवा.

आरोग्यदायी त्वचेसाठी योगासन
ताडासन आरोग्यदायी त्वचेसाठी अतिशय उपयुक्त ठरते.

ताडासन कसे करावे?

  1. दोन्ही पायांत 10 सेंटिमीटर अंतर ठेवून आरामात उभे राहा. दोन्ही पावलांवर शरीराचा भार समान येऊ द्या. श्‍वसनावर लक्ष केंद्रित करा. दोन्ही हात शरीराच्या बाजूला सरळ असू द्या.
  2. हळूहळू दोन्ही हात कोपरातून ताठ करत, डोक्याच्या वर जाऊ द्या. हात कानाजवळ सरळ वरच्या दिशेने उचललेले असायला हवेत. हातांचा कानाला स्पर्श व्हायला हवा.
  3. दोन्ही हाताच्या बोटांची एकमेकांत गुंफण करून तळवे आकाशाच्या दिशेने ठेवा किंवा दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा करा किंवा दोन्ही हात सरळ वरच्या दिशेने ठेवा.
  4. दृष्टी समोरच्या एका बिंदूवर केंद्रित करा. (संपूर्ण आसनभर दृष्टीची ही स्थिरता अतिशय महत्त्वाची आहे.)
  5. दीर्घ श्‍वास घेऊन हात, खांदे, छाती यांना वरच्या दिशेने ताणण्याचा सहज प्रयत्न करा.
  6. याच वेळी टाचा वर उचलून पायाच्या बोटांवर उभे राहा.
  7. संपूर्ण शरीराचा तोल सांभाळत, पावले न हलवता संपूर्ण शरीर पावलांपासून मस्तकापर्यंत वरच्या
    दिशेने खेचण्याचा प्रयत्न करा.
  8. श्‍वास रोखून ठेवण्याच्या आपल्या क्षमतेनुसार अंतिम स्थितीत राहिल्यावर, हळुवार श्‍वास सोडत शरीरावरील ताण हलका करत, प्रथम टाचा जमिनीवर टेकवा आणि नंतर हळूहळू हातही खाली आणून विश्राम अवस्थेत उभे राहा.
  9. हळूहळू वाढवत नेत, अशी 5-10 आवर्तने करा.
    आसन केल्यावर लगेच ताजेतवाने वाटणे, हे आसन व्यवस्थित जमल्याची खूण आहे. शरीराचा तोल सांभाळणे जमले की, मनाची स्तब्धताही सहज साधता येते.
    सौंदर्याची कामना असेल, तर शरीराची आंतर्बाह्य देखभाल आणि त्यासोबत सकस आहार व नियमित व्यायाम यांना आपल्या दिनचर्येत स्थान द्यायलाच हवे.

Share this article