Close

हिवाळ्याचे नो टेन्शन केस राहतील सुंदर (Hair Care Tips for Winter Season)


काही सहजसाध्य दक्षता घेतल्यास आणि साधे-सोपे उपाय केल्यास हिवाळ्याच्या रूक्ष हवेतही तुमचे केस आनंदाने नाचू लागतील.
अचानक कोसळणार्‍या जलधारांमुळे चिंब होणं नाही, की कडक उन्हामुळे घामात भिजणं नाही… हिवाळ्यातल्या दिवसांची मजा काही औरच. धुक्यात उगवणार्‍या पहाटेची गुलाबी थंडी… नंतर कोवळ्या उन्हाची ऊब… त्यात कधी दिवाळी, तर कधी नाताळाच्या निमित्ताने मिळणारी मोठ्ठी सुट्टी… एकंदरीत मन अगदी प्रसन्न करणारं वातावरण. पण या मौसमात मनाइतकीच प्रसन्नता आपल्या त्वचेला, केसांनाही होते का? या प्रश्‍नाला बहुधा ‘नाही’ हेच उत्तर एकमताने मिळेल. त्यातही हिवाळ्याची चाहूल लागताच त्वचेच्या संरक्षणासाठी मॉश्‍चरायझर, लिप बामचा वापर सुरू करायचा, हा नियम बहुतेकांना माहीत झालाय… अगदी सरावाचाही झालाय. पण केसांचं काय?
‘हिवाळ्यात केसांचे हाल पाहवत नाहीत…’ अशा तक्रारी करण्यापलीकडे, हिवाळ्यात केसांचे सौंदर्य आणि आरोग्य टिकून राहावे यासाठी अभावानेच कुणी तरी काही तरी करतं. कारण बहुधा अनेकांना काय करावं हे माहीतच नसतं. खरं म्हणजे, काही सहजसाध्य दक्षता घेतल्यास आणि साधे-सोपे उपाय केल्यास हिवाळ्याच्या रूक्ष हवेतही तुमचे केस आनंदाने नाचू लागतील.
नियमित करा तेल मालीश
बाहेर कोरडा वारा आणि घरात वा ऑफिसमध्ये तुलनेने उबदार हवामान… हवामानातील सततचा हा फरक केसांसाठी अधिकच नुकसानकारक ठरतो. केसांना होणारे हे नुकसान टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे, तेल मालीश. यासाठी संपूर्ण केसांना आणि केसांच्या मुळाशी गरम तेल लावून, हळुवार मालीश करा. यामुळे केस आणि डोक्यावरील त्वचा चांगल्या प्रकारे मॉश्‍चराइझ होईल. हे तेल किमान तास-दोन तासांसाठी तसेच राहू द्या आणि नंतर केस धुवा. केस धुतल्यानंतरही केसांना थोडे तेल राहिले आहे असे वाटल्यास, पुन्हा केस धुऊ नका. कारण यामुळे केसांना छान कंडिशनिंगचा इफेक्ट मिळेल आणि तेच केस पुन्हा धुतल्यास ते राठ दिसण्याची शक्यता आहे.

केस वारंवार धुऊ नका

हिवाळ्यातील कोरड्या वार्‍यामुळे आधीच आपली त्वचा आणि केस कोरडे झालेले असतात. त्यात वारंवार केस धुतल्यामुळे ते अधिकच कोरडे होतात. म्हणूनच आठवड्यातून दोनपेक्षा अधिक वेळा केस धुणे टाळा. तसेच केस धुण्यासाठी सौम्य शाम्पूचा
वापर करा. हिवाळ्यात कडक गरम पाण्याने अंघोळ करण्याचा कितीही मोह होत असला तरी, किमान केस धुण्यासाठी तरी
असे गरम पाणी मुळीच वापरू नका. कारण केस गरम पाण्याने धुतल्यास, त्यातील आर्द्रता निघून जाऊन ते अधिक रूक्ष होतात. कोमट पाण्याने केस धुवा, म्हणजे थंडीही भासणार नाही आणि केसांमधील आर्द्रताही टिकून राहील.

कंडिशनरचा वापर अवश्य करा

कोरड्या झालेल्या केसांना मॉश्‍चराइझ करण्यासाठी कंडिशनरचा वापर अवश्य करा. प्रत्येक वेळेस केस धुतल्यावर त्यांवर
चांगल्या दर्जाचे कंडिशनर आवर्जून लावा. कंडिशनर केसांच्या मुळाशी लागणार नाही याची काळजी घेत, केसांच्या टोकापर्यंत व्यवस्थित लावा. असे नियमित केल्यास थंडीमुळे केसांचे होणारे नुकसान टाळता येईल आणि केसांना छान चमकही येईल. चांगल्या परिणामांसाठी केसांच्या प्रकारानुसार योग्य कंडिशनरची निवड करा.

हेअर ड्रायरचा वापर टाळा

खरं म्हणजे, केस नैसर्गिकपणे सुकवायला हवेत. त्यामुळे केसांवर हेअर ड्रायरचा वापर न करणेच योग्य ठरते. पण तरीही तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करत असाल, तर त्याचा अतिरेक होणार नाही, याची दक्षता अवश्य घ्या. त्यातही सेटिंगमधील ‘कूल’ मोडवर हेअर ड्रायर वापरल्यास, केस सुकवण्यासाठी अधिक वेळ लागला तरी, थंड वार्‍यामुळे केसांना जास्त नुकसान होणार नाही.

स्कार्फ वा टोपी आवर्जून वापरा

स्कार्फ वा टोपीचा वापर करून केसांचे कोरड्या वार्‍यापासून हमखास संरक्षण करता येईल. पण हा स्कार्फ किंवा टोपी केसांवर घट्ट बसणार नाही, याची काळजी अवश्य घ्या. कारण ते केसांवर घट्ट बसल्यास, केसांच्या मुळाशी असलेल्या रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

हे करून पाहाच!

तेल गरम करून त्यात थोडा लिंबूरस एकत्र करा. या गरम तेलाने केसांच्या मुळाशी मालीश करा. तसेच सर्वप्रथम लिंबूरस केसांच्या मुळाशी चांगल्या प्रकारे लावून, हळुवार चोळून, नंतर त्यावर गरम तेलाने मालीश करता येईल. यामुळे केसातील कोंडा निघून जाईल.
कंगवा करून केसांमधील गुंता काढा. नंतर केसांना मुळापासून टोकापर्यंत मध लावा. केसांवर टॉवेल वा शॉवर कॅप लावून,
ते 30 मिनिटांकरिता तसेच ठेवा. नंतर कोमट पाण्याने केस धुवा. यामुळे निस्तेज व रूक्ष केसांना छान चमक आणि बाऊन्स येईल.
ऑलिव्ह ऑईल गरम करून त्याने केसांच्या मुळाशी हळुवार मालीश करा. यामुळे तेल केसांच्या मुळाशी खोलवर पोहचेल आणि केसांमधील कोंडा निघून जाऊन, ते सतेज होतील.

Share this article