Close

पती-पत्नीत सुसंवाद ही काळाची गरज (Harmony Between Husband And Wife Is The Need Of The Hour)

पती-पत्नीने विवाह झाल्यानंतर आपले वैवाहिक जीवन व कौटुंबिक जीवन सुखाचे, समाधानाचे राहण्यासाठी आपापसात सहकार्य, सद्भाव, सद्विचार व सद्वर्तन ठेवण्याची नितांत गरज आहे.
कुटुंब किंवा ज्याला परिवार म्हणतात, ते कुटुंब म्हणजे एक रथ आहे. आणि या रथाची दोन चाके म्हणजे पती आणि पत्नी होत. हा रथ सुस्थितीत राहावा, तो सुस्थितीत चालावा, जीवनातील खाचखळग्यांनी उलटून न जाता हा कौटुंबिक रथ शांत, सहज व संथगतीने, परंतु संयम व सामंजस्याने पुढे न्यावा, अशी अपेक्षा असते. परंतु अलीकडे कुटुंबाच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत. परिस्थितीही पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यामुळे कुटुंबव्यवस्था मर्यादित होत आहेत. कुटुंब म्हणजे पती-पत्नी अशी व्याख्या आजकाल करण्यात येते. आई-वडील कुटुंबाच्या व्याख्येतून वगळण्यात आले आहेत. वेगळेपणा जपता जपता पती-पत्नीत कधी कधी शुल्लक कारणांवरून खटकेही उडतात. वाद-प्रतिवाद होतात.
यामुळे घटस्फोटासारखे प्रकार वाढत आहेत. विभक्त राहण्याचे प्रकार वाढत आहेत. अनेकांचे वाद न्यायालयात आहेत. अनेकांचे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये आहेत. यामुळेच आजची कुटुंबव्यवस्था खिळखिळी होऊन मोडकळीस आलेली आहे.
नाते दृढ करायला हवे
विवाह हा धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक संस्कार आहे. या विवाह संबंधांना सामाजिक मान्यता आहे, याचे भान ठेवावे. एकदा पती म्हणून ज्याचा स्वीकार केला त्याच्याशी प्रामाणिकपणे आपले संबंध अधिक दृढ करण्याची नितांत गरज आहे. पतीनेही पत्नीला समजावून घेतले पाहिजे. पत्नीच्या चुका जाणून घेऊन त्या मार्गी लावण्यात तिला धीर द्यावयास हवा. तिच्या मनातील शंका-कुशंकांचे जाळे-जळमटे पुसून टाकायला हवे व सर्वस्वी ती आपली सहधर्मचारिणी आहे, या धार्मिक संस्काराची आठवण पदोपदी ठेवून पती-पत्नीचे नाते दृढ करायला हवे.
भावनांचा आदर करा
पती-पत्नीने विवाह झाल्यानंतर आपले वैवाहिक जीवन व कौटुंबिक जीवन सुखाचे, समाधानाचे राहण्यासाठी आपापसात सहकार्य, सद्भाव, सद्विचार व सद्वर्तन ठेवण्याची नितांत गरज आहे. पती-पत्नीला संपूर्ण आयुष्य एक-दुसर्‍याच्या सहकार्यानेच पार पाडावयाचे आहे. एक-दुसर्‍याची सुख दु:खे, यश-अपयश आपापसात वाटून घेऊन जीवन जगावे. एकमेकांच्या सहकार्यातच खर्‍या जीवनाचा आनंद सामावलेला आहे. एक-दुसर्‍याच्या भावभावनांचा आदर करीत सद्भावनेने जीवन जगणे ही काळाची गरज आहे.

संशयी वृत्ती टाळावी
पती-पत्नीत अगदी किरकोळ कारणांवरून वाद होतात. एकमेकांविषयी संशय घेणे, एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेणे, पत्नीचे पूर्व चारित्र्य जाणून घेणे; यामुळे पती-पत्नीत वारंवार वाद होतात व त्याचा परिणाम वाद-प्रतिवाद, आत्महत्या किंवा हत्या करण्यामध्येही होतो. दोघेही पती-पत्नीने संशयी वृत्ती टाळावी. दोघांनीही एक-दुसर्‍याशी एकनिष्ठ राहावे व आपले नातेसंबंध टिकविण्यास पोषक विचाराप्रमाणे वागावे व वर्तन ठेवावे. स्वत:चा अहंभाव दोघांनीही टाळावा.
पत्नीने बोलावं…पतीने ऐकावं
पतीला सगळ्याच गोष्टी सांगाव्यात, त्याच्याजवळ मन मोकळं करावं असं स्त्रियांना वाटतं; पण त्याची प्रतिक्रिया काय होईल, या विचाराने त्या बोलत नाहीत. मनातलं काय आहे ते बोलणार्‍या स्त्रिया फार थोड्या असतात. पत्नी आपल्याशी का बोलत नाही याचा विचार पतीनेही करायला हवा. प्रत्येक क्षणात, विचारात, सुख:दुखाच्या प्रसंगात सोबत राहू, असं वचन सात फेरे घेताना दिलं होतं याचा विचार करून पुरुषांनी पत्नीला काय वाटतंय हे समजून घ्यायला हवं. असं बर्‍याच संसारात होत नाही. कारण पती-पत्नीत संवाद नसतो आणि हेच विसंवादाचं कारण बनतं. घरात वाद नको म्हणून बरेचदा स्त्रिया मनातलं बोलत नाहीत; पण न बोलण्यातून अनेक प्रश्‍न निर्माण होतात. हे पती आणि पत्नीनेही लक्षात घ्यायला हवं. याचा अर्थ पत्नीने काहीही बोलावं आणि पतीने निमूटपणे ऐकून घ्यावं असा नाही. दोघांच्याही संवादात तारतम्य असायला हवं. भांडणं होतात म्हणून बोलायचं नाही, ही पती-पत्नीची भूमिका चुकीचीच आहे.
संसार दक्षतेनेच करावा
पुरुष हे स्वभावत: बहिर्मुख असतात. व्यसनांकडे झुकण्याचा त्यांचा जास्त कल असतो. आपण कमावतो म्हणून आपल्याला कसंही वागण्याची मोकळीक आहे, असा समज पुरुषांनी करून घेणे सर्वस्वी चूक आहे. आजकाल स्त्रियाही संसारात ताळतंत्र सोडलेल्या पतीप्रमाणे वागू लागल्या तर काय होईल याचा विचार करायला हवा.
विपरीत परिस्थितीत अनेकांचे संसार टिकून राहतात; कारण अशा जोडप्यांनी दक्षतेने संसार केलेला असतो. एकमेकांना समजून घेत, सांभाळत, आदर करत, परिस्थितीचं भान ठेवत, एकमेकांवर प्रेम करत त्यांनी संसार केलेला असतो. एकमेकांसाठी स्वभावाला मुरड घालणं यातला आनंद लक्षात आला की सुखी संसाराचं वेगळं रहस्य नाही, हे लक्षात येतं. नाही का?
-दादासाहेब येंधेे

Share this article