हिंदी चित्रपटाच्या इतिहासात "शोले' हा चित्रपट फार महत्त्वपूर्ण आहे. या चित्रपटानं लोकप्रियतेचे मापदंड बदलले, अनेक कलाकारांचं करिअर घडवलं. शोले हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. म्हणूनच "शोले" या चित्रपटाच्या महानतेला "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" या मराठी चित्रपटातून सलाम केला जाणार आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. नुकतेच मुंबई फेस्टिवल येथे या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले होते.
केवळ कथानकच हटके नाही तर, या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम बालकलाकार श्रीरंग महाजन अशी दमदार स्टारकास्ट असून, अभिनेते आनंद इंगळे, समीर धर्माधिकारी हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार असला तरी, अद्याप याची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.
"हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" या चित्रपटाच्या नावातूनच "शोले" या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होतं, पण चित्रपटाच्या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे.