सध्या हिरामंडी ही संजय लीला भन्साळी यांची वेब स्टोरी चर्चेत आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता नेटफ्लिक्सने या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची घोषणा केली आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा प्रत्येक प्रोजेक्ट हा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. जवळपास सर्वच कलाकारांना त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असते. त्यामुळे 'हिरामंडी' या वेब सीरिजची घोषणा झाल्यापासूनच सर्वांमध्ये उत्सुकता होती. ही सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आता या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची घोषणा करण्यात आली आहे. हा चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे.
संजय लीला भन्साळी आणि नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत सीजन २ ची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील मरीन ड्राइव्हवर सिनेमातील डान्सर्स क्रूने एकत्र येत या सीरिजमधील सगळ्या गाण्यांवर फ्लॅश मॉब सादर केला आणि सीजन २ लवकरच येत असल्याची घोषणा करण्यात आली. हा फ्लॅश मॉब पाहण्यासाठी खूप गर्दी जमली होती. कोरियोग्राफर कृती महेशने हा डान्स कोरियोग्राफ केला होता. या व्हिडिओला 'मेहफिल फिरसे जमेगी, हिरामंडी सिझन २ आयेगा’ अशी कॅप्शन दिली आहे.
प्रेक्षकांनी सोशल मीडियावर कमेंट्स करत सीजन २ साठी उत्सुकता दर्शवली आहे. अनेकांनी वेबसीरिज मध्ये पूर्वीचीच कास्ट ठेवण्याची मागणी केली आहे. पण पहिल्या सिझनमध्ये बिब्बोजानचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे सिझन २ मध्ये आदिती राव हैदरी असणार की नाही याविषयी सर्वांना प्रश्न पडला आहे. एका यूजरने 'शर्मिन सेगलला घेऊ नका' असे म्हणत कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने नेटफ्लिक्सचे खूप आभार असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजकरने 'ताजदार आणि बिब्बोजान शिवाय हिरामंडी असणार का?' असा प्रश्न विचारला आहे. चौथ्या एका यूजरने थेट 'आमलजेबचा मृत्यू पहिल्याच एपिसोडमध्ये पाहायचा आहे' असे म्हटले आहे.
मात्र चाहत्यांना त्यांची उत्सुकता ताणून धरावी लागणार आहे कारण हा सिझन कधी प्रदर्शित होणार याविषयी माहिती समोर आलेली नाही.