वरुण राजाचं आगमन झालं की चाहूल लागते ती वटपौर्णिमा सणाची. पती-पत्नीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा हा सण स्टार प्रवाहच्या मालिकांमध्येही उत्साहात साजरा होणार आहे. महाराष्ट्राची नंबर वन मालिका अर्थातच ठरलं तर मग मध्ये यंदाची वटपौर्णिमा खास ठरणार आहे.
सायली-अर्जुनचं नातं बहरु लागलं आहे. दोघांनीही एकमेकांवरच्या प्रेमाची कबूली दिली नसली तरी मनात मात्र जन्मोजन्मी आम्हाला एकमेकांची साथ लाभू दे अशी इच्छा व्यक्त केलीय. यंदा वटपौर्णिमेची पूजा सायली तर करणारच आहे पण सायलीसोबत अर्जुनही वडाभोवती सात फेऱ्या घेऊन हे व्रत पूर्ण करणार आहे. अर्जुनने सायलीसाठी उपवासही केला आहे. अतिशय रोमॅण्टिक असा ठरलं तर मगचा वटपौर्णिमा विशेष भाग असणार आहे.
अर्जुन-सायली प्रमाणेच मुरांबा मालिकेतला अक्षयही रमासोबत वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे. आरतीच्या निधनानंतर तिच्या बाळाची जबाबदारी रमाने स्वीकारली. आईच्या मायेने ती या बाळाला जीवापाड जपतेय. आईपणाच्या सगळ्या जबाबदाऱ्या नेटाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतेय. तिच्या या नव्या जबाबदारीमध्ये अक्षयही तिला मनापासून साथ देतोय. वटपौर्णिमेच्या पुजेसाठीही उसंत नसताना अक्षयने रमासाठी पुजेची सर्व तयारी केली. रमा आणि आपल्या लेकीसोबत वडाभोवती फेरे घेताना जबाबदारीही अशीच जन्मोजन्मी पूर्ण करेन हे वचन त्याने रमाला दिलंय.
लक्ष्मीच्या पाऊलांनी मधील कला, घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील ऐश्वर्या आणि साधी माणसं मालिकेतील मीरा देखिल लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. सण म्हटलं की आनंद आणि उत्साह हा आलाच.