Close

‘मासिक पाळी, मूड स्विंग, गरमी… अशात शुटिंग करणं सोपं नाही’… – हिना खान (Hina Khan Wishes She Didn’t Have To Shoot On First Two Days Of Her Periods)

'ये रिश्ता क्या कहलाता है' (Ye Rishta Kya Kahlata Hai) या स्टार प्लस वाहिनीवरील मालिकेमध्ये अक्षरा (Akshara) ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री हिना खान (Hina Khan) आता चित्रपटांतूनही अभिनय करताना दिसते. सध्या हिना तिची पहिली पंजाबी फिल्म 'शिंदा शिंदा नो पापा' (Punjabi film Shinda Shinda No Papa) मुळे चर्चेत आहे. हिना खान सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे आणि आपल्या चाहत्यांसोबतही ती कनेक्टेड राहते.

नुकतेच हिनाने पीरियड्स दरम्यान शूटिंग करताना होणारी तिची अडचण व्यक्त केली असून हे सर्व कोणत्याही महिलेसाठी सोपे नसते असे लिहिले आहे. हिना खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये मासिक पाळी दरम्यान रजा न मिळाल्याबद्दल तिने तिची वेदना व्यक्त केली आहे. हिनाने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले - "मासिक पाळी दरम्यान काम करण्यास 'नाही' म्हणता येण्याचा पर्याय असायला हवा होता, अशी माझी इच्छा आहे." तिने पुढे लिहिले की, "पीरियड्सच्या पहिल्या दोन दिवसात शूट न करण्याचा पर्याय असता तर सर्व अभिनेत्रींसाठी ते बरे झाले असते."

मासिक पाळी दरम्यानची रजा यासारख्या गंभीर विषयावर बोलताना तिने लिहिले की, "मला मासिक पाळीतील पहिले दोन दिवस शूटिंग न करण्याचा पर्याय मिळाला तर खूप छान होईल. खरं तर त्या दिवसांत अशीही शरीरात फारशी ताकद नसते, अन्‌ जवळपास ४० अंश डिग्री तापमानात बाहेर शूट करावे लागते.... हे सर्व सोपे नाही आहे."

हिना खानच्या या पोस्टचे अनेक महिला आणि मुलीही समर्थन करताना दिसत आहेत आणि मासिक पाळीला सुट्टी द्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. हिना खानच्या आधी करीना कपूरसह अनेक अभिनेत्रींनीही मासिक पाळीच्या सुट्टीच्या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे.

महिलांच्या मासिक पाळीच्या सशुल्क रजेचा मुद्दा देशात अनेकदा चर्चेत आला आहे. गतवर्षी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी महिलांना मासिक पाळीच्या सशुल्क रजा देण्याबाबत मतभेद व्यक्त केले होते. अनेकांनी त्यांच्या मताचे समर्थन केले होते, तर अनेक महिलांनी त्यांना कडाडून विरोधही केला होता.

Share this article