Close

तडजोड (Short Story: Tadjod)


जिथं स्टोरी डिपार्टमेंट नसते तिथं फायनान्सर, निर्माता, दिग्दर्शक, कॅमेरामन हे स्टोरी ऐकायला बसतात. लेखक वाचतो आणि पहिल्यापासून बदल सुचवले जातात. मग कोणतीही कथा असो ती इतर मालिकांचा रंगढंग ओळखून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे नेली जाते.
सुप्रसिध्द लेखक (हा त्याचा आवडता शब्द) चंदू चंद्रात्रे (खरे नाव मधू मुटाटकर) काहीतरी नवीन हटके लिहायच्या विचारात होता. त्याचे डोके काम करत नव्हते. काही केल्या विषयच सुचत नव्हता. त्याची पत्नी चंद्रिका कालच बदलापूरला माहेर गेली होती. तिच्या भावाचा बहात्तरावा वाढदिवस त्यांच्या सूना, नातवंडे (एक दोन नातजावई सुद्धा होते), लेकी म्हणजे चंद्रिका व तिची कोल्हापूरची धाकटी बहिण अंबिका, तसेच लग्न झाल्या झाल्या वेगळे झालेले दोन भाऊ अजय आणि अतुल या सर्वांनी मोठ्या थाटामाटात करण्याचे ठरवले होते. पत्नीची ब्याद गेली व तिच्यासोबत पिंकी व टोन्या (खरे नाव तनुश) गेल्यामुळे त्याला अगदी छान मोकळे मोकळे वाटत होते. काल त्याचा बालपणीचा मित्र धनपत चौधरी हा जवळ जवळ 15 वर्षांनी (मुंबईत राहूनही) त्याचा पत्ता शोधत आला होता.
तो स्टोरीक्रॅप्ट या भरमसाठ मराठी / हिंदी सिरियल्स बनवणार्‍या कंपनीत प्रॉडक्शन मॅनेजर होता. फर्डे इंग्लिश बोलणे व साहेबी संस्कारात तो पुरेपूर मुरलेला ( तो एक दोनदा परदेश वारी करून आलेला होता) असल्यामुळे गेली दहा वर्षे तरी या नोकरीत टिकून होता. योगायोगाने चंदूचा (खरे तर मधूचा) ’बायको गेली उडत’ हा विनोदी कथांचा संग्रह त्याच्या वाचनात आला. त्यावर चंदूचा मोबाईल नंबर व गायवाडीतला पत्ता होता. त्याने मुद्दामच त्याला फोन केला नाही व सरळ घरी जाऊन त्याला आश्चर्यचकित करायचे ठरवले आणि त्याप्रमाणे तो आला होता.
नमस्कार चमत्कार झाल्यावर सोफ्यावर स्थानापन्न होत धनपत म्हणाला, “आज मी एक काम घेऊन आलो आहे. मी स्टोरीक्रॅप्ट या टी. व्ही. सिरियल कंपनीत कार्यरत आहे.”


“हो, तुमची ती ’तात्यांची रांगोळी’ सिरियल मी कधीतरी झोप नाही आली तर पाहतो; त्यात दिग्दर्शकाअगोदर तुझे नाव येते - कार्यकारी निर्माता धनपत चौधरी! मी पत्नीला नेहमी सांगतो हा धनपत चौधरी म्युनिसिपल शाळेत माझ्या बाजूच्या बाकावर बसायचा आणि मुलींच्या खोड्या करायचा. पुढचं मी सांगितलं नाही. एकदा एका मुलीच्या भावाने याला तुडव तुडव तुडवले होते. तू एकदा माझे वडापावचे पैसे दिेले होतेस, या उपकाराला कसा विसरेन मी…?”
“तू बाबा पहिल्यापासून समोरच्यांची टिंगल टवाळी करण्यात नंबर वन होतास, म्हणून तर एवढा मोठा विनोदी लेखक झालास! बरं ते तुमच्या भाषेत नमनाला घडाभर ऑइल असं तू म्हणण्यापूर्वी मी मुळ मुद्यावर येतो. पुढच्या महिन्यात आमची कंपनी नवीन सिरियल काढण्याच्या विचारात आहे. तेव्हा मला नवीन कथेची अपेक्षा आहे. यासाठी तुला कथेचे घसघशीत मानधन अडीच लाख रुपये देऊ. वरती संवाद लेखन केलेस तर तीन लाख मिळतील. सासू-सुनांच्या त्याच त्याच चावून चावून चोथा झालेल्या सिरियल्स पाहून प्रेक्षक जाम बोअर झाले आहेत. तेव्हा त्यांना काहीतरी चटपटीत, खमंग- टेस्टी द्यावे असे मला वाटते.”
“काही तरी बोलू नको. चटकदार द्यायला ती काय भय्याची ओली भेळ आहे?”
“काय आहे, आजची फॅशन उद्याला जुनी होते. तशीच प्रेक्षकांची रुची दिवसागणिक बदलते आहे. म्हणून म्हटले, तुला माहीत असलेच पुलं.चं लोकप्रिय नाटक ती फुलराणी हे इंग्लिश ’पिग्मॅलियन’ या नाटकावर बेतलेले आहे आणि त्याचं पुल्लिंगी करून पुरू बेर्डे यांनी ’हमाल दे धमाल’ हा सर्वांग सुंदर चित्रपट बनवला, तशी तुझी एखादी कथा तुझ्याकडे आहे का?”
“म्हणजे प्रेक्षकांच्या शिव्या लाथा खायची माझी तयारी नाही. मग माझ्या ’माझी कुठे शिंकली’ या कथासंग्रहातली ’युद्ध आमचे सुरू’ ही कथा चांगली आहे… पण मी असे ऐकले आहे की मालिकेची कथा जरी लेखकाची असली तरी इतर पाच-सहा लेखक आपापल्या अकलेप्रमाणे त्या कथेत मसाला भरतात. सर्वांची जी खिचडी होते तिला मालिकेची कथा म्हणतात. जिथं स्टोरी डिपार्टमेंट नसते तिथं फायनान्सर, निर्माता, दिग्दर्शक, कॅमेरामन हे स्टोरी ऐकायला बसतात. लेखक वाचतो आणि पहिल्यापासून बदल सुचवले जातात. मग कोणतीही कथा असो ती इतर मालिकांचा रंगढंग ओळखून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे नेली जाते. मग इकडे नवरात्र तर तिकडे देवीची आरती. इकडे दिवाळी तर तिकडे करंज्या लाडू अशी सरमिसळ (खरे तर भेळ) चाललेली असते. एकही कथा प्रसिद्ध न झालेला निर्माता जर कथा/पटकथा/संवाद लेखन करायला लागला तर आमच्या सारख्या लेखकाची कथा कोण घेणार आणि समजा घेतली तर तिचे इतरांकडून धिंडवडे काढणार.
हेच, हेच मला नको आहे, म्हणून तर मोठ्या आशेने तुझ्याकडे आलो आहे.”
चंदू चंद्रात्रे आज एकदम खूष होता कारण धनपत त्याची कथा घेऊन गेला होता. कदाचित आपली कथा क्लीक झाली, तर चार दिवस सासुचे या मालिकेने तब्बल दहा वर्षे काढली होती (खरे तर प्रेक्षकांचा अंत पाहात) तशीच आपली सिरियल चालली तर दहा वर्षात गाडी - बंगला - सहज घेता येईल. उठसूट साहेबाची बोलणी खात दिवस रेटायची, म्युनिसिपाल्टीतल्या कारकुंड्याच्या भिक्कार नोकरीवर लाथ तरी मारता येईल. अशी शेखचिल्ली स्वप्ने तो रंगवायला लागला. तेवढ्यात मोबाईल वाजला. फोनवर नेहमीप्रमाणे चंद्रिका होती. त्याचा उत्साहाचा पारा एकदम खाली आला. कारण नेहमी चंद्रिका माहेरी गेली की तिचे पैसे माहेरच्या माणसांसाठी संपतात मग ती गुगलवर पाच-दहा हजार रुपये पाठवायला सांगते.
‘’हां, बोल किती पैसे हवेत? माझा मोबाईल बिघडलाय.”
“अहो तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? पैसे ते तर मी कालच काढले, लपवलेले एटीएम कार्ड शोधून… तुमचा मोबाईल कधी धड असतो. आधी पंखा बंद करा आणि मी सांगते ते ऐका - मी परत घरी येते आहे. दादाचा वाढदिवस कँसल झाला आहे… ”
“का? त्यांचं जुलाबाचं दुखणं परत उपटलं की काय?”
“काहीतरी फालतू विनोद करू नका. उद्या संध्याकाळी सात वाजता हिंदुस्थान - पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे ना, तो आम्हाला पाहायचा आहे. दादालाही तो संपूर्ण सामना डोळे भरून पाहायचा आहे. ”
“मग बाकीचे काय डोळे बंद करून पाहतात?”


“पांचटपणा पुरे! येणार्‍या म्हणजे वाढदिवासाला येणार्‍या पाहुण्यांनी चक्क नकार कळवला आहे, तेव्हा त्याचा वाढदिवस पुढे ढकलला आहे. मग मी घरी येऊ?”
‘’मुळीच नको आणि काय गं रविवारी क्रिकेट सामना आहे हे टी. व्ही. वर, मीडियावर, पेपरमध्ये घसा खरवडून सांगत होते, तेव्हा तुझा दादा…?”
“त्याच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले आहे आणि त्यांचा टी.व्ही. दोन दिवस उंदराने वायर खाल्ल्यामुळे बंद होता. झालं समाधान?”
“मस्त एन्जॉय करा बर्थ डे. उशिरा केलात तरी चालेल, तेवढे दादाचे आयुष्य वाढेल… आता मुद्यावर येतो. अगं मला एका टी. व्ही. चॅनेलची ऑफर आली आहे. माझ्या एका कथेवर ते पूर्ण लांबीची मालिका बनवताहेत. पाच लाख रुपये मानधन मिळणार आहे.”
‘’कोणाचा जीव वरती आलाय?” त्या पाठोपाठ जोरदार हास्य ऐकू आले. तिने फोन ठेवला. हिला आपण मानधनाचा आकडा उगीचच सांगितला. कारण लगेच ती घराचे इंटिरियर करूया म्हणेल आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट तिच्या मामेबहिणीच्या आर्किटेक्ट नवर्‍याला शरदला द्या म्हणून हमखास सांगेल. या आगामी भीतीने त्याचा चेहरा फिका पडला.
दोन दिवसांपूर्वी दादरच्या शिवाजी मंदीरमध्ये कला क्षेत्रातल्या विचारवंतांचा एक परिसंवाद झाला होता. करोनाच्या बुरख्याआड सरकारने सिने-नाट्य कलावंताची केलेली गळचेपी यावर काही सभासदानी (नाट्यशाखा / चित्रपट /शाखा) आपली परखड मते मांडली होती. त्यामुळे चांगलाच गदारोळ माजला होता. त्यांचा एकंदीरत रोख फोफावत चाललेल्या दूरदर्शन मालिकांच्या इंडस्ट्रीवर होता. त्यातले एक वक्ते, श्री. म. रा. मानकापे आपल्या जळजळीत भाषणात म्हणाले,
‘’आजकाल दूरदर्शनवर दररोज नव्या नव्या मालिका येताहेत. या चॅनलने चार काढल्या तर दुसरे झेडव्हाय चॅनेलवाले मिळतील ते कलाकार व काही कामच उरले नाही अशा लेखकांना घेऊन आठ मालिका काढताहेत आणि प्रेक्षक आठ नाही वाजले तर त्यांची चातकासारखी वाट पाहतात. अशा मालिका पाहणार्‍यांचं बौद्धिक आणि मानसिक वय जास्तीत जास्त अकरा वर्षे असते. संध्याकाळी साडे सहा ते रात्रीचे साडे अकरापर्यंत मालिका पाहणार्‍यांचा मेंदू कार्यरत राहिला तर त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरला जरूर भेटावे.”
यावर ’काळ नवा’ या जुन्या वर्तमानपत्रात अखिल भारतीय नारी - मालिका संघटनाच्या मुख्य प्रवक्त्या आणि सर्वेसर्वा - श्रीमती चंदा चावरे यांनी ’वाचकांचा पत्रव्यवहार’ या सदरात आपले भूतो न भविष्यती मत मांडले होते.
“हा म. रा. की जगा मानकापे स्वतःला फार शहाणा समजतो का? त्याच्या डोळ्यात मोतीबिंदू झाले असतील. नको पाहू सिरियल्स, त्याचा आम्हाला त्रास का? ही लोकशाही आहे. इथे कोणी काय पाहायचे? हे ठरवणारा हा टिकोजीराव कोण? याने असले पोरकट मत मांडून समस्त प्रेक्षकांचा जो अपमान केला आहे त्याला माफी नाही. खरे तर अशा समाजकंटकांना भर रस्त्यात उघडे करून चाबकाचे फटके द्यायला पाहिजे व त्याचे लाइव्ह चित्रिकरण करून ते टी. व्ही. वर दाखवायला हवे. त्याने बर्‍या बोलाने प्रेक्षकांची माफी मागावी अन्यथा आमची महिला संघटना तो असेल तिथून हुडकून त्याच्या तोंडावर काळी शाई उडवल्याशिवाय राहणार नाही.”
“हे काहीतरी भयंकर आहे. रंगभूमी, चित्रपट यावर सरकारने बंदी आणली. त्यामुळे मालिका निर्मात्यांची चंगळ झाली व त्यांच्या मालिका जनमानसात चांगल्याच रुजल्या. त्यामुळे लोक आपोआप नाटक / सिनेमाला विसरले असा चुकीचा समज करून घेणे हे चुकीचे आहे.” एवढे मोठे वाक्य की ओळी चंदू चंद्रात्रे एका दमात (मनातल्या) म्हणाला.
“मित्रा आजचा काळ नवा पेपर वाचलास? मग ती भडक बातमी तुझ्या चक्षूंखालून गेली असेलच. तुमच्या व्यवसायाबद्दल बरीच आगपाखड झालेली आहे. यावर तुझे म्हणणे काय आहे?”
“तू म्हणतोस ते सगळे अगदी शब्द न् शब्द वाचला. मला त्यांचा मुळीच राग आला नाही. उलट त्यांचे आभार मानायला हवेत. कारण दोन दिवसात आमच्या ’तात्यांची रांगोळी’ या सिरियलचा टीआरपी दहा पटीने वाढला. मध्यंतरी या सिरियलची जनमानसातली पकड जरा ढिली पडली होती. तेव्हा आमच्या निवड समितीने ठरवले होते. मराठीतल्या दोन चार आक्रमक पत्रकारांना (त्यांचा काय असेल तो रेट देऊन या सिरियलबद्दल तुम्हाला जितके वाईट लिहिता येईल तेवढे लिहा.) पण नशीब ते काम परस्पर काळ नवाने बीना मोबदला केले आहे.”
“ते सर्व ठीक आहे; पण माझी कथा वाचली का? … तुमच्या निवड समितीने… एक बेकार तरुण आपल्या हिंमतीने परिस्थितीवर मात करतो. दीन, दुबळ्यांची सेवा करण्यासाठी तो आपल्या श्रीमंत प्रेयसीला नकार देऊन आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतो.”
“मित्रा, ते म्हणतात इथेच घोडे पेंड खाते आहे. खूप चुकले आहे आणि ही कथा सत्तर- पंचाहत्तर वर्षांपूर्वी आलेल्या इथेच मा. विनायक यांनी गाजवलेल्या आचार्य अत्रेंच्या ब्रह्मचारी या चित्रपटाच्या कथेशी साम्य दाखवते. शिवाय नायक लग्न करीत नाही. त्यामुळे हिरॉईनचे पुढे काय करायचे? हिरॉईनला कधीही सासू ही हवीच. घरात तिचे राज्य हवे. ती हिटलरची बहिण शोभेल अशी असावी. त्यामुळे सासू- सूनेत खटकेबाज संवादांची आतषबाजी असली की टी आर पी वाढतो. शिवाय ज्या सासू गरीब सासू आहेत व त्यांची सून वटवट सावित्री, बनेल, चढेल, नटवी असेल त्यांना हरलेल्या प्रसंगी सूनेवर प्रतीवार हल्ला (शाब्दिक) कसा करावा याचे आपोआप प्रशिक्षण मिळते. लग्न नसल्यामुळे कांदेपोहे, नकार, होकार, अपमान, हळदी, भव्य लग्न सोहळा, निमंत्रणपत्रिका शिवाय गरमागरम हनिमूनचे गाणेही नाही. प्रेक्षकांना ध्येयवाद नकोय, चंगळवाद हवा आहे. हे सर्व लेखकाला मान्य असेल तर पुढे बोला असे ते सदस्य म्हणताहेत.”
“काय करतात हे सदस्य? नुसत्या कथेच्या शंकरपाळ्या करीत बसतात? यांची नावे तर सांग, त्यांच्या नावावर किती कथा प्रसिद्ध झाल्या आहेत? ”
“मला तसे आठवत नाही पण दोघा तिघांची माहीत आहेत. आजपर्यंत एकाच्याही नावाने एखाद्या फडतूस मासिकात एकही कथा प्रसिद्ध झालेली नही. त्यांचे क्वालिफिेकेशन म्हणशील तर ते निर्मात्याच्या गोटातले आहे. एखाद्या कलाकाराने त्यांना हे असे का? असे जरी विचारले तर त्याचे पेमेंट मिळण्यात सतरा विघ्ने येतात. त्यांची नावे त्यांना शोभतील अशी आहेत. बैले, डुकरे, लांडगे, कोडगे अशी आहेत. मी निर्मात्यांशी या तुझ्या कथेबद्दल बोललो. तर त्यांनी लगेचच हात वरती केले.”
ते म्हणाले,‘’त्या सर्वांना मी मुळीच विरोध करू शकत नाही. त्यांच्यामुळेच हा माझा सिरियलचा कारोबार गेली दहा वर्षे बिनबोभाट चालला आहे. त्यांच्यामुळे मला बरेच फायदे मिळतात. एखादा वरचढ कलाकार अति करायला लागला की क्षणात त्याची माती करायला तत्पर! एकतर ते त्याला परदेशी पाठवतात, नाहीतर कथेत त्याला भयंकर अपघात झालेला दाखवून कायमचा वरती (देवाकडे) पाठवतात. त्यामुळे होते काय, ते जे जे बोलतील ते लेखक /दिग्दर्शक / कलाकार यांना मान्य करावेच लागते. दुसरा पर्याय नसतो. तर सांगायचा मुद्दा असा की कथेचे अंत्यसंस्कार तुला मान्य करावे लागतील.” (पलीकडून फोन बंद झाला)
क्षणभर काय निर्णय घ्यावा तेच त्याला कळेना. त्याची मती कुंठीत झाली. मूळ कथेची इतकी चिरफाड - अत्याचार (असल्या नाठाळांकडून ) होत असतील तर मग आपली कथा औषधालाही उरणार नाही. त्यापेक्षा त्यांना नको म्हणून सांगावे? मग पाच लाख हातोहात जातील नकारापाठोपाठ.


त्याचा चिंताग्रस्त चेहरा पाहून चंद्रिका पुढे होत म्हणाली, ‘’लेखक महाशय, असा चेहरा का पडलाय? बरे वाटत नाही का? फक्कडसा येवले चहा करून आते. तुमचा मूड फ्रेश करायला.”
“चंद्रिका मागे तुला मी बोललो होतो. माझा मित्र धनपत माझी कथा नवीन मालिकेसाठी घेऊन गेला होता. तो आज काय वेगळेच बोलायला लागला. त्यांची 6 जणांची कथा निवडसमिती आहे. तेच ठरवतात कथा घ्यायची की नाही ते. त्यांनी माझ्या कथेत एवढे बदल सुचवले आहेत की यात माझी कथा साखरेच्या दाण्याइतकीही उरत नाही. मी त्यांना नाही सांगणार आहे. नको ती प्रसिद्धी, नकोत ते पाच लाख! मला हवे आहे समाधान!”
“काही तरी अभद्र विचार करू नका. दारी आलेल्या लक्ष्मीला लाथाडू नका. आपली परिस्थिती ही अशीच राहणार आणि राहिला प्रश्न समाधानाचा ते या जन्मी मिळणे अशक्य आहे. लग्न झाल्यापासून माझी एक इच्छा होती महाबळेश्वरच्या थंड हवेत आठ दिवस राहून सुखद गारवा - गोड अनुभव घ्यावा. पण ते नशीबात असायला हवे. तुमच्या आई, सासूबाई मध्येच कडमडल्या. म्हणाल्या, कशाला हवाय महाबळेश्वर आणि माथेरान… तिथल्या महागड्या हॉटेल मालकांच्या तुंबड्या भरायला? आणि एक दिवस घोड्यावर बसून कोणी महाराणी ताराराणी होत नाही. मध्यमवर्गीयाने मध्यम राहावे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगिकारावी आणि तुम्ही पडलात श्रावणकुमार! आई म्हणाली असती, मला एका कावडीतून काशीयात्रा घडव. तर तुम्ही नंदी बैलासारखी मान हलवून म्हणाला असता, चांगलीशी कावड घेऊन येतो. आपल्या यथातथा परिस्थितीला बदलायची आयती संधी आली आहे, ती हातची सोडू नकोस. मला एक सांग सिरियलमध्ये दाखवले जाणारे एकाच टाइपचे प्रसंग आपल्या आयुष्यात घडणार आहेत ?… मुळीच नाही. सिरिअलची कथा भंकस, टूकार कामचलाऊ आहे, म्हणून कोणी रागाने आपला टी. व्ही. फोडला असे एकतरी उदाहरण तू आजपर्यंत ऐकले आहेस का? नाही ना, लोक मेंदू फ्रिजमध्ये ठेवून निमूटपणे पाहतात ना, मग तुझा एवढा अट्टाहास का?”
चंदू त्याच अवस्थेत उठला. त्याला चंद्रिकाचे विचार हळूहळू पटायला लागले. त्याने लगेच धनपतला फोन लावला.
“हॅलो धनपत, मी चंदू. मला तुझ्या निवड समितीचे सगळे बदल मान्य आहेत. ते म्हणतील तसले बदल करून घ्यायला मी एका पायावर तयार आहे, फक्त ते पाच लाख मला लवकरात लवकर मिळतील असे काही तरी कर… ”

Share this article