लग्नाची धामधूम सुरू होताच कामांचे ढिग साचतात. घरातील प्रत्येक जण काही ना काही काम करू लागतो. नववधू आपल्या कपड्यांची, दागदागिन्यांची खरेदी यात गर्क असते. त्याचबरोबर आपण लग्नाच्या दिवशी सुंदर दिसावं म्हणून देखील ती जागरूक होते. सौंदर्य आणि फिटनेस याबद्दल वधू फारच सावधगिरीने पवित्रा उचलत असते.
सौंदर्याची निगा राखण्याबरोबरच फिटनेस देखील महत्त्वाचा ठरतो. कारण प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत वेगवेगळ्या विधींमध्ये वधू बिझी असते. शिवाय अलिकडच्या रिवाजांप्रमाणे प्रत्यक्ष लग्नाच्या दिवसाआधी संगीत कार्यक्रम, मेंदी कार्यक्रम, हळदी समारंभ यामध्ये देखील सहभाग घ्यावा लागत असल्याने चांगलेच श्रम होतात. हे श्रम सोसण्यासाठी स्टॅमिना राखणे गरजेचे ठरते. अन् स्टॅमिना राखण्यासाठी फिटनेस राखणे तितकेच महत्त्वाचे असते.
तेव्हा लग्न समारंभात फिट, स्लीम आणि सुंदर दिसायचे असेल तर लग्नाआधी किमान चार आठवडे फिटनेसची योजना तयार करा. लग्नाच्या धामधुमीत स्वतःसाठी किमान एक तास वेळ काढा. तासभर नियमितपणे व्यायाम करा. म्हणजे सौंदर्य आणि फिगर दोन्ही राखता येईल. या व्यायाम प्रकारात कार्डिओ, पिलेटस्, योगा, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार यांचा समावेश करा. तसेच आहाराचे नियोजन करा.
घरीच वर्कआऊट करा
आजकाल जिम्मध्ये जाऊन वर्कआऊट करण्याची फॅशन आली आहे. त्यामध्ये कार्डिओ, स्ट्रेचिंग वगैरे प्रकार अत्याधुनिक यंत्रांद्वारे केले जातात. परंतु जिम्मध्ये करायचे हे वर्कआऊट खर्चिक असल्याने सगळ्यांनाच परवडतील, असे नाही. तेव्हा घरच्या घरी करता येतील. घरी मशिन्स नसतील, पण मशिन्सने करण्याचे व्यायाम तुम्ही असेही करू शकता. त्यानुसार चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. दररोज सकाळी अर्धा तास चालण्याचा व्यायाम घ्या. घराजवळ जॉगिंग पार्क किंवा मोकळा रस्ता असेल, तर तिथे चाला. नसेल तर घरी जागेवरच चालण्याची क्शन करा. जॉगिंगची अॅक्शन करा. जागच्या जागी उड्या मारा. दोरीवरच्या उड्या मारणे, हा सर्वोत्तम आणि सर्व अंगाला होणारा व्यायाम आहे.
तंदुरुस्तीसाठी एरोबिक्स
एरोबिक्स हा वर्कआऊटचा नवा फॅशनेबल प्रकार आहे. तोही खर्चिकच आहे. काही फिटनेस एक्सपर्ट महिला फी घेऊन एरोबिक्सचे क्लास चालवतात. ही फी आपल्याला परवडेलच असे नाही. अन् क्लासेस घराजवळ असतील, हेही शक्य नाही. त्यामुळे तिथे जाण्यायेण्यात वेळ खर्च होऊ शकतो. हे सगळं टाळता येईल. अन् एरोबिक्स घरीच करता येतील. तेव्हा तालबद्ध संगीत लावा. अन् त्याच्या बिटस्वर ताल धरत व्यायाम करा. झुंबा देखील अशाच प्रकारे घरी करता येईल. घाम फुटेस्तोवर हे व्यायाम करा. त्याच्याने शरीरातील जास्तीत जास्त कॅलरीज् बर्न होतील. शिवाय मेटॅबोलिक रेट वाढेल. अंगातील चयापचय शक्ती वाढल्याने पाचनसंस्था तंदुरुस्त राहील. अन् अर्थात्च तुम्हीही तंदुरूस्त राहाल.
सूर्यनमस्कार आवश्यक
योगा, प्राणायाम करा आणि सूर्यनमस्कार जरूर घाला. मात्र या गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीने शिकून घ्या. म्हणजे अडचण येणार नाही. योगामध्ये ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, बालासन, पश्चिमोत्तानासन, सेतूबंधासन, मार्जरासन जरूर करा. त्याच्याने शरीरातील अनावश्यक द्रव्ये निघून जातील. स्नायू शिथिल होतील. आणि अंगातील चरबी झडेल. सूर्यनमस्कार घातल्याने देखील या सर्व गोष्टी साध्य होतील. प्राणायमात भस्त्रिका, अनुलोम विलोम, भ्रामरी यांचा सराव अवश्य करा. प्राणायम तर सवड मिळेल तेव्हा दिवसातून 3-4 वेळा करू शकता. योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार हे प्रकार सकाळच्या वेळेस करण्याची शिफारस केली गेली असली तरी, कामामुळे सकाळी जमले नाही, तर सायंकाळी देखील करायला हरकत नाही.
आहाराचे नियोजन
या व्यायाम प्रकारांसोबतच आहाराचे नियोजन करायला हवे. आहार तर काटेकोरपणे घ्यायला हवा. जंक फूडला चक्क नकार द्या. खरेदी निमित्त बाहेर फिरणे होते. तेव्हा खाद्यपदार्थांची हॉटेल्स, जंक फूडस्चे जॉईंटस्, खाऊ-गल्ल्या आपल्याला खुणावत असतात. त्यांच्याकडे संपूर्णतः दुर्लक्ष करा. घरचा सात्त्विक आहार घ्या. जेवणात सॅलडस् घ्या. ताक, दही यांचे सेवन करा. फायबरयुक्त भाज्या, कडधान्ये आवर्जून खा. तळलेल्या पदार्थांचा त्याग करा. सूप, सरबते, ज्यूस प्या. नारळ पाणी पिणे सर्वोत्तम. कामाचा कितीही व्याप असला तरी ब्रेकफास्ट आणि जेवणाच्या वेळा चुकवू नका. वेळच्या वेळी या गोष्टी करा. दिवसभरात भरपूर पाणी प्या. दिवसातून कमीत कमी तीन फळे खा. दोन जेवणांच्या मधील वेळात हा फलाहार करणे सर्वोत्तम असते. फळांमध्ये व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, प्रोटिन्स असतात. त्यामुळे शरीराला पोषण तत्त्वे तर मिळतातच. पण चेहरा व त्वचेला तजेला येतो.
या सर्व गोष्टी लग्नाआधी किमान चार आठवडे पाळल्यात तर तुमचे सौंदर्य खुलून येईल. फिटनेस राखला जाईल, शरीर सुडौल राहील. अन् लग्नप्रसंगी अंगी चैतन्य राहील.