Close

मुलांना जबाबदार कसे बनवाल ? (How To Make Children Responsible?)

सुरुवातीच्या काळातच मुलांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत, त्यांना जबाबदारीचे धडे दिले पाहिजेत. नाहीतर मोठेपणी ही मुलं बेजबाबदार होण्याची शक्यता अधिक असते.
मुलांना शिस्त शिकवण्याकडे दुर्लक्ष करणे प्रत्येक पालकांसाठी डोकेदुखी होऊन जाते. पूर्वी शिस्त शिकवण्यासाठी पालक कमी बोलायचे आणि हात पाय अधिक चालवायचे. मात्र शिस्त शिकवण्याची ही जुनी परंपरा आता मुलांना बंडखोर बनवत चालली आहे. म्हणूनच मुलं लहान असतानाच त्यांच्या संगोपनाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. सुरुवातीच्या काळातच मुलांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत, त्यांना जबाबदारीचे धडे दिले पाहिजेत. नाहीतर मोठेपणी ही मुलं बेजबाबदार होण्याची शक्यता अधिक असते. आपल्या मुलांना जबाबदारीचे धडे कसे शिकवायचे, जाणून घेऊया. ..
सतत धडे देऊ नका
मुलांना प्रत्येक गोष्टीत टोकल्याने मुले चिडचिड करतात. मुलांच्या लहानसहान चुकांसाठीही पालक त्यांना दररोज लांबलचक उपदेशाचे डोस देत राहतात. तुमच्या या सवयीमुळे मुलं काही शिकण्याऐवजी तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागतात. तेव्हा लहानपणापासूनच मुलांना लहान गोष्टी करायला शिकवा. जसे - चॉकलेट खाल्ल्यानंतर त्याचे रॅपर कचर्‍याच्या डब्यात टाकणे, खेळून झाल्यानंतर खेळणी जागच्या जागी ठेवणे इत्यादी. मुलं हळूहळू मोठी होत जातील तसतसे त्यांना त्यांची छोटी-छोटी कामे करायला शिकवा. यातून मूल स्वतःचे काम स्वतः करायला शिकते.

दुर्लक्ष करू नका
कोल्हापूरच्या 44 वर्षीय श्रीमती शालिनी यांना त्यांच्या 10 वर्षांच्या मुलाच्या, कार्तिकच्या बेजबाबदारपणाबद्दल सांगितले, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया थक्क करणारी होती. मुलं या वयात बेजबाबदारपणे नाही वागणार तर कधी वागणार? मोठा झाल्यावर स्वतःच सुधारेल, असे त्या म्हणाल्या. तुम्ही देखील शालिनी सारख्या स्वतःच्या मुलाच्या बेजबाबदारपणाकडे दुर्लक्ष करत असाल तर वेळीच सावध व्हा. हा निष्काळजीपणा तुम्हाला भविष्यात खूप महागात पडू शकतो.
अचानक नकार देऊ नका
जस जशी मुलं मोठी होत असतात, ती स्वतःला समंजस समजू लागतात. अशावेळी एखाद्या गोष्टीसाठी त्यांना सतत नकार दिल्यास त्यांना वाईट वाटतं. उदाहरणार्थ तुमचा मुलगा वा मुलगी कंम्प्युटरवर गेम खेळत आहे आणि तुम्ही तिला / त्याला लगेच गेम बंद करायला सांगितले तर त्यांना राग येतो. तेव्हा त्यांना एखादी गोष्ट करण्यास मनाई करताना थोडा वेळ द्या. जसे- रोहन, आता बस बेटा, पुढच्या 5 मिनिटांत तू कॉम्प्युटर बंद कर आणि अभ्यासाला बस, असे सांगा. नाहीतर दुसर्‍या दिवशी त्यांना त्याच गोष्टीसाठी प्रेमाने समजवा.

स्वत:ची वर्तणूक सुधारा
अनेक वेळा मुलं पालकांना पाहतात तसेच वागतात. जसे - अनेक घरांमध्ये घरातील सर्व कामांव्यतिरिक्त पतीची सर्व कामे देखील पत्नीला करावी लागतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचे काम स्वतः करायला शिकवत असता, तेव्हा ते काम करण्यास मुलं नकार देतात. त्याची सबब देताना, पप्पा त्यांची चादरही घडी घालत नाहीत, स्वतःचं जेवलेलं ताटंही उचलत नाहीत, असं ते म्हणतात. म्हणूनच पती-पत्नी दोघांनीही मुलांसमोर अतिशय हुशारीने वागलं पाहिजे आणि त्यांना काहीही शिकवण्यापूर्वी किंवा बोलण्यापूर्वी स्वतःला सुधारलं पाहिजे.
काहीही लादू नका
मुलाला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी, आपण संयमाने वागणे खूप महत्त्वाचे आहे. इतरांच्या सांगण्यावरून वा आपल्या मर्जीसाठी त्यांच्यावर काहीही लादणे टाळा. पालक म्हणून तुम्हाला खूप सामंजस्याने घेता आलं पाहिजे. तुमच्या एका चुकीमुळे तुमचं मूल बिघडू शकतं. तेव्हा गरजेपेक्षा जास्त त्यांना बोलू नये.

सीमारेषा घालून घ्या
वाढत्या वयानुसार, मूल हळूहळू पालकांच्या प्रत्येक गोष्टीला प्रतिउत्तर देऊ लागते. अशा वेळी प्रत्येक गोष्टीवर त्याच्याशी वाद घालण्याऐवजी शांत राहा. बदलापूरचा 35 वर्षीय आनंद सांगतो, मला 12 वर्षांची मुलगी आहे, आता काळ इतका बदलला आहे की अनेकवेळा इच्छा करूनही मी तिला कशासाठीही नकार देऊ शकत नाही, ती जसजशी मोठी होत आहे, तसतशी माझी जबाबदारी वाढत जाते. अनेकदा असे घडते की एखादी गोष्ट ऐकून स्वीकारण्याऐवजी ती माझ्याशी वाद घालू लागते. अशा परिस्थितीत मी स्वतःलाच शांत करतो, ती सुद्धा एका क्षणी शांत होते आणि पुन्हा कधीच वाद घालत नाही. माझा विश्वास आहे की मुलांशी वाद घालण्याऐवजी आपण स्वतःमध्ये आणि त्यांच्यामध्ये एक सीमारेषा निश्चित केली पाहिजे.

Share this article