Close

सुसह्य उन्हाळा कसा कराल? (How to make summer bearable?)

‘जीव नुसता नकोसा झालाय’, ‘गर्दी अगदी जीवघेणी वाटतीये’, हे संवाद लवकरच कानी पडतील नि अंगातून निघणार्‍या घामाच्या धारा उन्हाळा आल्याची जाणीव करून देतील. हा रणरणता उन्हाळा सुसह्य करणार्‍या काही महत्त्वाच्या बाबी.

भरपूर पाणी प्या
दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करा. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते. तसंच दिवसभरात भरपूर पाणी प्या. तहान लागल्यावरच फक्त पाणी पिऊ नका. तर थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाणी पित राहा. त्यामुळे तुम्ही डिहायड्रेट होणार नाही.

हलका व्यायाम करा
खरं तर व्यायामाला सुरुवात करण्यासाठी हिवाळा उत्तम. परंतु कोणत्याही ऋतूत व्यायाम करणे महत्त्वाचे. हेवी एक्सरसाइज करताना खूप दमछाक होते. म्हणून त्या टाळून हलका व्यायाम करा. स्विमिंग हा पर्याय सर्वात उत्तम. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो व व्यायाम देखील होतो. व्यायामामुळे शरीर व मन प्रसन्न राहील.

योग्य आहार
हलका आणि घरगुती आहार घ्या. फास्ट फूड, जंक फूड खाणे टाळा. आहारात फळांचे प्रमाण वाढवा. चेरीज्, स्ट्रॉबेरीज्, कलिंगड यांसारखी हंगामी फळे अवश्य खा.

सुती, सैलसर कपडे वापरा
घट्ट कपडे घालणं शक्यतो टाळा. फिक्या रंगाचे, सैलसर कपडे वापरा. त्यामुळे तुमच्या शरीराला मोकळा श्‍वास घेता येईल. तसेच अ‍ॅलर्जी, रॅश अशा त्वचा विकारांपासून बचाव करता येईल. कपडे घट्ट असल्यास घामाचा त्रास अधिक होतो. त्याचबरोबर काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळा. काळा रंग 98% उष्णता शोषून घेतो. शक्य असल्यास भर दुपारी, उन्हाच्या वेळी घराबाहेर पडू नका.

नारळपाणी उत्तम
कोल्ड ड्रिंक्स, सोडा पिणे टाळा. त्याऐवजी लस्सी, ताक, नारळपाणी पिणे योग्य. त्यामुळे शरीराला थंडावा मिळेल.

एनर्जी ड्रिंक्स
उन्हाळ्यात लिंबूपाणी सर्वात उत्तम. त्यामुळे थकवा जाणवत असल्यास लिंबूपाणी प्या. तसेच ग्लुको डी, इलेक्ट्रॉलचे पाणी या सारखे एनर्जी ड्रिंक्स सोबत ठेवा.

सनक्रिम महत्त्वाचे
उन्हाने त्वचा काळवंडणे ही तर नित्याचीच समस्या आहे. परंतु उन्हाळ्यात याची तीव्रता अधिक वाढते. त्यामुळे नियमित सनक्रिम लोशन वापरा. त्यामुळे त्वचेचे संरक्षण होईल.
सनक्र्रिम लावल्यानंतर 20 मिनिटांनी घराबाहेर पडा. तसंच ठराविक वेळाच्या अंतराने पुन्हा याचा वापर करा.

डोळ्यांची सुरक्षा
बाहेर जाताना सनग्लासेसचा वापर जरूर करावा. त्यामुळे सुर्याच्या तीव्र किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण होईल. डोळ्यांना कोरडेपणा येणार नाही. तसेच डोळ्यांभोवती येणार्‍या सुरकुत्यांपासूनही त्वचेचे रक्षण होते.

स्कार्फ वापरा
उन्हामुळे केस देखील कोरडे, रूक्ष होतात. बाहेर जाताना डोक्याला स्कार्फ गुंडाळा. त्याच्याने केसांचे तसेच त्वचेचे ही संरक्षण होते. हा उपाय म्हणजे फॅशन विथ प्रोटेक्शन.

ताण दूर सारा
सकाळी अंघोळ करताना जास्त गरम किंवा अगदीच थंड पाण्याने अंघोळ करू नये. त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. दिवसभर बाहेर फिरल्यामुळे घामाने शरीर चिकट होतं. त्यामुळे या दिवसात रात्री पुन्हा अंघोळ करावी. म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि दिवसभराचा ताण कमी होईल.

पुरेशी झोप
झोपेचे महत्त्व आपण जाणतोच. त्यामुळे उन्हाळ्यात पुरेशी झोप घ्या. पुरेशी झोप झाल्याने तुम्हाला उत्साही वाटेल.

झाडे लावा
उन्हाळ्याच्या झळा जाणवायला लागताच एक मेसेज वाचनात आला तो असा की, गरमीने त्रस्त झालेला एक माणूस सुर्याला मेसेज करतो की सुर्यदेवा, तुमचा ब्राइटनेस कमी करा. त्यावर सुर्यदेव उत्तर देतात की, सेटींग्समध्ये जा, झाडे लावा. लगेच कार्बन डायऑक्साईड कमी होईल. वातावरण शुद्ध होईल व थंड राहील.
किती अर्थपूर्ण आणि डोळ्यात अंजन घालणारा मेसेज आहे हा. त्यामुळे पुढचे उन्हाळे सुसह्य करण्यासाठी आतापासूनच झाडे लावूया.

Share this article