Close

सौंदर्य समस्यांचे सोपे उपाय (Simple Solutions To Beauty Problems)

मेकअप करताना वा ब्युटी पार्लरमध्ये सौंदर्योपचार घेताना तुम्हाला छोट्या छोट्या समस्या वा तक्रारी निर्माण होतात. या समस्या छोट्या असल्या तरी केलेला मेकअप वा सौंदर्य बिघडवण्याचं काम चोख पार पाडतात. अशा या सौंदर्य समस्या चुटकीसरशी सोडविण्यासाठी हे काही सोपे उपाय.


समस्या : नेल पॉलिश लावणं तर सोपं आहे, पण सुकण्यासाठी वाट पाहणं जरा कठीण वाटतं.
उपाय: नेल पॉलिश लगेच सुकण्यासाठी नखांवर नेल पॉलिशचा एक कोट लावल्यावर, बोटं थंड पाण्यात बुडवून ठेवा. दोन मिनिटे तसेच ठेवून नंतर दुसरा कोट लावा. आता पुन्हा तीन मिनिटे बोटं पाण्यात बुडवून ठेवा. असे केल्याने नेल पॉलिश व्यवस्थित सेट होते आणि लगेच सुकते. नेल पॉलिश सुकण्यासाठी हेअर ड्रायरचा वापरही करता येतो.
स्मार्ट टिप : नेल पॉलिश सुकण्यासाठी हेअर ड्रायर वापरताना ड्रायर कूल मोडवर ठेवा.
समस्या : वॅक्सिंग केल्यानंतर हात मुलायम आणि सुंदर दिसतात. परंतु वॅक्सिंग करताना त्वचेची भयंकर आग होते.
उपाय : वॅक्सिंग करताना त्वचेची होणारी आग वेगळी उत्पादने वापरून दूर करता येते. याचबरोबर, मासिक पाळी दरम्यान कधीही वॅक्सिंग करून नये. या काळात आपली त्वचा अधिक संवेदनशील झालेली असते.
स्मार्ट टिप : वॅक्सिंग केल्यानंतर लगेच त्वचेला कोल्ड क्रिम लावावे.


समस्या : चेहर्‍याची त्वचा अधिक कोमल असल्याने फेशियल केल्यानंतर चेहरा लाल होतो किंवा चेहर्‍यावर लाल पुरळ वा रॅशेस येतात.
उपाय : तुमच्या बाबतीतही असेच होत असेल तर फेशियलनंतर लगेच चेहरा थंड पाण्याने धुवा किंवा स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून चेहर्‍यावर थंड पाण्याचा स्प्रे मारा. असे केल्याने फेशियलमुळे होणार्‍या अ‍ॅलर्जीचा त्वचेवर परिणाम होणार नाही.
स्मार्ट टिप : फेशियलनंतर चेहर्‍यावर बर्फ लावल्यासही फायदा होतो.
समस्या : हाताची आणि पायाची नखं कधी कधी इतकी कडक होतात की, त्यांना योग्य आकार देणं अथवा कापणंही कठीण होतं.
उपाय : नखं सहसा आंघोळीनंतर किंवा पाण्यात बराच वेळ काम केल्यानंतर कापावीत. जास्त वेळ पाण्याच्या संपर्कात आल्याने नखं मऊ होतात आणि त्यांना योग्य आकार देणं आणि कापणं सोपं होतं.
स्मार्ट टिप : नखं जास्त वेळ पाण्याच्या संपर्कात आल्यानं मऊ होतात परंतु ती तुटूही शकतात. तेव्हा अगदी फार वेळ नखं पाण्याच्या संपर्कात ठेवू नयेत.
समस्या : कपाळावरील समोरील बाजूचे केस अथवा भांगेतील केस पांढरे होतात. असे केस लगेच ब्युटी पार्लरमध्ये जाऊन कलर करता येत नाहीत.


उपाय : भांगेतील अथवा कपाळावरील समोरील बाजूचे केस अचानक पांढरे दिसू लागल्यास मस्काराच्या साहाय्याने हे केस तात्पुरते काळे करता येतात.
स्मार्ट टिप : केस लांब असतील तर कलर करण्याआधी कापावेत. यामुळे केसांना योग्य प्रकारे कलर करता येतात.
समस्या : लांब केस धुणं जितकं अवघड आहे, तितकंच हे केस सुकवणंही अवघड आहे.
उपाय : केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करता येतो. प्रथम केसांचा आतील भाग सुकवा. नंतर बाहेरील बाजूवर ड्रायर फिरवा. यामुळे केस व्यवस्थित सुकतील. हेअर ड्रायर जास्त गरम करू नये. अन्यथा केस रूक्ष आणि कडक होतील.
स्मार्ट टिप : शक्यतो केस टॉवेलने हळुवार पुसावे. पुसताना प्रथम पाणी टिपून घ्यावे. यामुळे केस लवकर सुकतात.
समस्या : चांगल्या पार्लरमध्ये केस कापले तरी कधीकधी हेअर कट आवडत नाही आणि केस शेपलेस दिसू लागतात.
उपाय : हेअर कट केल्यानंतरही केस शेपलेस दिसू लागल्यास, हेअर बॅण्ड, हेअर क्लिप
किंवा कोणत्याही हेअर अ‍ॅसेसरीद्वारे बिघडलेला हेअर कट लपवू शकता. हे वापरल्याने केसांचा स्टायलिश लूकही वाढेल.
स्मार्ट टिप : हाय बन किंवा लो बन हेअर स्टाइलद्वारे बिघडलेला हेअर कट दिसू नये, यासाठी प्रयत्न करता येतात.
समस्या : झोपल्यानंतर उशी अथवा जाड चादरीमुळे चेहर्‍याची त्वचा दबून चेहर्‍यावर
रेषा येतात, ज्या फार वेळ तशाच राहतात.


उपाय : चेहर्‍यावर आलेल्या रेषा दूर करण्यासाठी कोमट पाण्याने चेहरा धुवा.
तसेच त्वचेच्या या भागावर कोल्ड क्रिम लावून हाताने मसाज करा. असे केल्याने रेषा मिटतात.
स्मार्ट टिप : कॉटनऐवजी सॅटीनची उशी वापरावी. यामुळे चेहर्‍यावर रेषा उमटत नाहीत.
समस्या : फार वेळ झोपल्याने डोळ्यांना सूज येते. ज्यामुळे चेहरा खराब दिसतो.
उपाय : डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी प्लॅस्टिक बॅगमध्ये बर्फाचे तुकडे भरा आणि
10 ते 15 मिनिटे ही बॅग डोळ्यांवर आणि डोळ्याच्या बाजूला हळूहळू फिरवत रहा. असे केल्याने डोळ्यांची सूज हळूहळू कमी होते.


स्मार्ट टिप : डोळ्यांवर थंड पाण्याचे हबकारे मारल्यानेही डोळ्यांची सूज कीम होते. शिवाय डोळे स्वच्छ होतात.
समस्या : कधी कधी आयब्रो करताना त्यांचा शेप बिघडतो.
उपाय : आयब्रो बिघडल्या तरी, डोळ्यांचा मेकअप करून बिघडलेल्या आयब्रोचा शेप लपविता येतो. शिवाय आयब्रो पेन्सिल वापरून बिघडलेला शेप नीट करता येतो. डोळ्यांचा मेेकअप योग्य रितीने खुलवल्यास आयब्रोचा बिघडलेला शेप लक्षात येत नाही.
स्मार्ट टिप : आयब्रो पातळ असल्यास आयब्रो पेन्सिल फिरवून त्याला चांगला लूक देता येतो.

Share this article