मनोरंजन क्षेत्रातील नामांकित अशा प्लॅनेट मराठी ग्रुपने व्हिस्टास मीडियासोबत हातमिळवणी करून 'प्लॅनेट भारत' या नवीन ओटीटीची घोषणा केली आहे. या नवीन ओटीटीवर विविध ठिकाणच्या स्थानिक भाषेतील, शैलीतील सर्वोत्तम असा कॉन्टेन्ट प्रदर्शित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत या 'प्लॅनेट भारत'ची घोषणा करण्यात आली असून नोव्हेंबर २०२३ पासून त्याचे प्रक्षेपण सुरु होणार आहे. भारतीय करमणुकीतील महत्वपूर्ण विकास म्हणून प्लॅनेट भारत विविध भाषांमधील हायपरलोकल कॉन्टेन्टची गरज पूर्ण करणार आहे. अर्थपूर्ण कॉन्टेन्टची निर्मिती, परवाना आणि वितरण करणे तसेच हा कॉन्टेन्ट सर्वोत्कृष्ट म्हणून नावारूपास आणणे, हा याचा मुख्य उद्देश असून मार्केटमधील सर्वात वेगळे ओटीटी अशी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.

या इंडस्ट्रीतील पोकळी भरून काढण्याची गरज आहे. जिथे विशिष्ट प्रकारच्या कॉन्टेन्टकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, त्यांना योग्य न्याय मिळाला नाही किंवा अकारण खर्च आहे. अशा कॉन्टेन्टना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न प्लॅनेट भारत करणार आहे. प्लॅनेट भारत आपल्या प्रेक्षकांसाठी नवीन, दर्जेदार आणि मूल्यआधारित मनोरंजनाचा अनुभव देणार आहे. प्लॅनेट भारत हे नाव आपल्या राष्ट्राच्या स्थानिक आणि जागतिक स्वभावाचे प्रतीक आहे. त्यामुळे जागतिकीकरण झालेल्या या जगात खऱ्या अर्थाने भारतीय असण्याचा सन्मान या निमित्ताने अधोरेखित करण्यात येईल. प्लॅनेट भारत फिचर फिल्म, वेबसीरिज, मालिका, संगीत, इन्फोटेनमेंट, नॉन फिक्शन, सोशल गेमिंग, वॉलेटसह एक सामाजिक मनोरंजन प्लॅटफॉर्मदेखील असेल.