Close

जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या धमक्यांना वैतागली जॅकलिन फर्नांडिस, घेतली दिल्ली पोलिसांकडे धाव ( Jacqueline Fernandez Writes Letter To Delhi Police Commissioner Against Sukesh Chandrashekhar )

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सुकेश चंद्रशेखर विरोधात दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तुरुंगातून सुकेश आपल्याला सतत त्रास देत असून धमक्या देत असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे.

'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या माहितीनुसार जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच पोलिस आयुक्त संजय अरोरा यांना पत्र लिहिले. तसेच साक्षीदारांना दिल्या जाणाऱ्या सुरक्षेवर तिने प्रश्न उपस्थित केले. अधिकृत ईमेल आयडीवरून केलेल्या तक्रारीत अभिनेत्रीने पोलिस आयुक्तांकडे आपल्या सुरक्षेसाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. भविष्यात आपल्याला धोका असल्याचे तिने या पत्रात नमूद केले आहे.

सुकेश तुरुंगातून आपला छळ करत असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. सुकेश आपला मानसिक छळ करतो. अभिनेत्रीचे म्हणणे आहे की, सुकेश तुरुंगातून तिच्याशी अशा प्रकारे संवाद कसा काय साधू शकतो . पोलिसांनी याप्रकरणी गांभीर्याने कारवाई करावी. तक्रारीत अभिनेत्रीने डिसेंबर २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रांची तीन कात्रणेही जोडली आहेत.  

जॅकलिन म्हणाली की, तिच्या सुरक्षेला धोका आहे, त्यामुळे या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर सुरू करण्यात यावा. तसेच त्याच्याविरुद्ध आयपीसी कलमांतर्गत एफआयआर नोंदवावा. कारण त्याचं असं वागणं केवळ मलाच त्रासदायक आहे असे नाही तर उलट देशाच्या कायदा, सुव्यवस्था आणि न्याय व्यवस्थेवर हा एक प्रकारचा हल्ला आहे. सुकेशकडे उपलब्ध असलेल्या सर्व संवादाच्या साधनांची तपासणी करुन त्याचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी जॅकलिनने केली आहे.

Share this article