आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बीबर आज मुंबईत पोहोचला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वी संगीत सेरेमनीमध्ये गायक परफॉर्म करणार असल्याचे वृत्त आहे. उद्या शुक्रवार, ५ जुलै रोजी अँटिलिया येथे संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जस्टिन बीबर आज सकाळी मुंबई विमानतळावर उतरला. गायकाच्या वाहनांच्या ताफ्याचे व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. बीबर ७ वर्षांनंतर भारतात आला आहे. तत्पूर्वी, २०२२ मध्ये तो येथे एक मैफिल करणार होता, परंतु आरोग्याच्या समस्यांमुळे ती रद्द करण्यात आली. यावेळी तो फक्त अंबानी कुटुंब आणि त्यांच्या पाहुण्यांसाठी परफॉर्म करणार आहे. द फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, जस्टिनने या लग्नात परफॉर्म करण्यासाठी सुमारे १० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे ८३ कोटी रुपये आकारले आहेत.
ॲडेल, ड्रेक आणि लाना डेल रे सारखे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी यात परफॉर्म करणार असल्याचं ऐकिवात आहे. राधिका मर्चंट लाना डेल रेची खूप मोठी फॅन आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, व्यवस्थापन संघ सध्या या तिन्ही कलाकारांशी चर्चेत व्यस्त आहे. त्यांना लग्नसोहळ्याला बोलावण्यासाठी तारीख आणि पैशांचा व्यवहार निश्चित करण्याची चर्चा सुरू आहे.
याआधी, रिहाना, कॅटी पेरी, पिटबुल, डीजे डेव्हिड गुएटा, ऑपेरा गायिका अँड्रिया बोसेली आणि बॅकस्ट्रीट बॉईज सारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांनी या जोडप्याच्या लग्नाआधीच्या दोन्ही कार्यक्रमांमध्ये परफॉर्म केले होते. याशिवाय दिलजीत दोसांझ आणि गुरु रंधावा या कलाकारांनीही स्टेजवर परफॉर्म केले.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वी संपूर्ण कुटुंब मामेरू विधीसाठी एकत्र दिसले होते. या कार्यक्रमातून राधिका आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे फोटो समोर आले आहेत. यादरम्यान, संपूर्ण अँटिलिया अगदी वधूप्रमाणे दिव्यांनी सजवण्यात आला होता. राधिकाच्या लूकबद्दल सांगायचे तर तिने या फंक्शनसाठी अतिशय सुंदर गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे, ज्यामध्ये ती हुबेहुब वधूसारखी दिसत आहे. मांग टिक्का, हेवी डायमंड नेकपीस आणि कानातले घालून राधिकाने हा लूक पूर्ण केला. या कार्यक्रमाला जान्हवी कपूर आणि प्रियकर शिखर पहाडिया देखील उपस्थित होते.
'मामेरू' फंक्शन म्हणजे काय?
मामेरू म्हणजे मामा. या विधीमध्ये वधूला वराच्या मामाकडून पारंपारिक कपडे, दागिने, पारंपारिक साड्या आणि बांगड्या (हस्तिदंतीच्या बांगड्या) भेटवस्तू मिळतात. अनंत आणि राधिका १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहे. हा विवाह सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार असून यामध्ये देशातील आणि जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार आहेत.