काजोल आणि अजय देवगण हे दोघेही बॉलिवूडमधील पॉवर कपल मानले जातात. दोघांच्या लग्नाला तब्बल २४ वर्षं उलटली आहेत. २४ फेब्रुवारी १९९९ साली त्या दोघांनी लग्न केलं. त्यांना निसा आणि युग अशी दोन मुलंही आहेत. काजोल सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. ती बऱ्याच वेळेस तिचं कुटुंब आणि मुलांबद्दल बोलत असते. यावेळी काजोलने तिच्या लग्नातील किस्सा सांगितला आहे.
कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत काजोलनं तिचं लग्न कसं झालं, याचा अनुभव सांगितला आहे. लग्नाचा किस्सा सांगताना, काजोलने म्हणाली, “वधू म्हणून मी अतिशय रिलॅक्स होते. मला माझ्या लग्नाचा काही स्ट्रेस, काही टेन्शन नव्हतं. पण मी लग्नात बरीच रेस्टलेस झाले होते. लग्नाचे विधी बराच वेळ सुरू होते, शेवटी मी अजयला कोपराने ढोसलं आणि म्हणाले की, भटजींना थोडं लवकर आवरायला सांग ना यार…”
“आमचं लग्न अगदी मोजक्या ५० लोकांच्या उपस्थितीत झाला. तो एक खासगी समारंभ होता. जेव्हा आमचं लग्न लागत होतं, तेव्हा मी अजयला म्हटलं की, भटजींना थोडं लवकर करायला सांग ना. ते बराच वेळ लावत होते. आमचं लग्न महाराष्ट्रीय पद्धतीने विधिवत झालं होतं. आम्ही सप्तपदीही घेतल्या. पण त्यावेळी तिथे बसून बसून मी थकले होते. कधी एकदा इथून उठता येईल, असं मला झालं होतं,’ अशी आठवण काजोलने सांगितली.
पुढे काजोल असंही म्हणाली की, मला माझ्या लग्नाचं काही टेन्शन घ्याव लागलं नाही, मला बिलकूल स्ट्रेस नव्हता. माझे कुटुंबिय आणि माझ्या बहीणी सगळी तयारी करत होत्या. त्यांनी सर्व जबाबदारी घेतली होती. माझं संपूर्ण कुटुंब स्ट्रेसमध्ये होतं, त्यांना सगळंच ऑर्गनाईज करायचं होतं. मी तर फक्त जाऊन मेकअप करायला बसले होते, असंही काजोलने सांगितलं.
काजोलच्या कामाबद्दल सांगायचे तर नुकतीच ती लस्ट स्टोरीज २ आणि द ट्रायल या थ्रिलर ड्रामामध्ये झळकली. तिच्या कामाचे खूप कौतुकही झाले.