दिग्दर्शक करण जोहर हा बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि यशस्वी दिग्दर्शक आहे. करण हा एका गंभीर मानसिक आजाराशी झुंज देत आहे. एका मुलाखतीत बोलताना त्याने याबाबत खुलासा केलाय. त्याने नुकत्याच एका मुलाखतीत बॉडी डिसमॉर्फियाचा उल्लेख केला होता. या कारणामुळे तो मोठ्या आकाराचे कपडे घालतो असे त्याने सांगितले होते.
फेय डिसूझा यांना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करण जोहरने म्हटले आहे की, मी माझ्या शरीराबद्दल आनंदी नाही. मी जसा दिसतो, जसा बेढब आहे, त्याबाबत मला कायम अवघडल्यासारखे वाटते. मला माझ्या शरीराबद्दल न्यूनगंड आहे आणि त्यामुळे पूलमध्ये जाताना मला आत्मविश्वास वाटत नाही. लहान असतानादेखील मला असेच वाटत असल्याचे करण जोहरने या मुलाखतीत म्हटले आहे. याबाबत अधिक बोलताना त्याने म्हटले आहे, “मी माझ्या या विचारांवर ताबा मिळविण्याचा, स्वत:च्या शरीराबद्दल आत्मविश्वास वाढविण्याचा फार प्रयत्न केला; पण आतापर्यंत मला याचे उत्तर सापडले नाही. मी कितीही वजन कमी केले तरी मला कायम हेच वाटत राहते की, मी जाड दिसत आहे आणि त्यामुळे मी ढगळे कपडे वापरण्यास प्राधान्य देतो. मी आठ वर्षांचा असल्यापासून माझ्यासोबत हे होत आहे आणि त्यामध्ये आजपर्यंत कोणताही बदल झालेला नाही. मला स्वत:च्याच शरीराची लाज वाटते.”
पुढे बोलताना करण जोहर म्हणतो की, कोणत्याही थेरपी किंवा समुपदेशनानेही माझ्या या समस्या कमी झाल्या नाहीत. त्याचा मला सतत त्रास होत असतो. या सगळ्याचा माझ्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असतो. दोन वर्षांपूर्वी माझ्या बाबतीत असेच काहीसे घडले. माझ्या ओळखीच्या लोकांमध्ये थांबणे माझ्यासाठी अवघडल्यासारखे झाले आणि मला पॅनिक अटॅक आला. तेव्हापासून मी समुपदेशनाचा आधार घेत आहे.
दरम्यान, करण जोहर लवकरच ‘बॅड न्यूज’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी हे कलाकार मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. ‘बॅड न्यूज’मधील ‘तौबा तौबा’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, विकीच्या डान्सची चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. हृतिक रोशन, सलमान खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांनी विकी कौशलचे कौतुक केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहे.