Close

करणच्या नव्या चित्रपटाची घोषणा! तब्बल बारा वर्षानंतर करणच्या चित्रपटात काजोल दिसणार (Karan Johar New Movie Sarzameen Announced)

निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा चित्रपट म्हटलं की चाहत्यांना त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. करण हा नेहमीच त्याच्या नाविन्यपूर्ण प्रोजेक्टसाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे. गेल्या वर्षी करणचा रॉकी और रानी की प्रेम कहानी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. आता करणची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

करणच्या त्या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या नव्या चित्रपटाचे संकेत दिले आहे. करणचा या वर्षातला तो पहिलाच चित्रपट असणार असल्याचे बोलले जात आहे. करणनं एक पोस्ट शेयर केली आहे त्यामध्ये त्यानं त्याच्या नव्या चित्रपटाविषयी चाहत्यांना कोडं घालत माहिती दिली आहे. मात्र ती पोस्ट शेयर करताना त्यानं ही माझ्या चित्रपटाची अनाउसमेंट नाही असेही म्हटले आहे. या सगळ्यात करणच्या हजारो चाहत्यांनी मात्र त्यानं त्याच्या नव्या चित्रपटाचीच घोषणा केली आहे असा अंदाज बांधला आहे.

करणला त्याच्या चित्रपटाचे मार्केटिंग करण्यात भलताच माहिर आहे. करणचा नवा चित्रपट यायचा झाल्यास त्याचे पीआर, आणि प्रमोशन याबाबत करणचा हात धरणारा कुणी नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशात त्याच्या नव्या चित्रपटाच्या घोषणेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात त्यानं म्हटलंय, “ही काही माझ्या चित्रपटाची अधिकृत घोषणा नाही पण ती असूही शकते. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुमची साथ असेल.

गेल्या वर्षभरापासून आमच्या चित्रपटाची शुटींग सुरु आहे. त्याबाबत कुणालाही काहीही माहिती नव्हते. खरं तर चित्रपटाच्या क्रु ला देखील या विषयी काहीही माहिती नाही. एवढी गोपनीयता आपण ठेवली आहे. हा निर्णय नव्या डेब्यू करणाऱ्या दिग्दर्शकानं घेतला आहे.”

करणची पोस्ट वाचल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात अनेकांनी त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव सरजमी असून त्यामध्ये सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान, साऊथचा अॅक्टर पृथ्वीराज सुकुमारन आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलही दिसणार आहे. तब्बल बारा वर्षानंतर काजोल ही करण जोहरच्या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रख्यात अभिनेते बोमन इराणी यांचा मुलगा कोयाज इराणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा आहे.

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Share this article