'दिल तो पागल है' या चित्रपटात करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यात झालेली डान्सची जुगलबंदी आजही लोकप्रिय आहे. आता २७ वर्षांनंतर दोघींनी त्याच गाण्यावर एकत्र डान्स केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या डान्सची जुगलबंदी पाहणं चाहत्यांसाठी पर्वणीच असते. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील दोघींच्या कामाचं आणि डान्सचं प्रचंड कौतुक झालं होतं. आता तब्बल २७ वर्षांनंतर या दोघी पुन्हा एकदा एकत्र आल्या आहेत. ‘डान्स दिवाने’ या शोमध्ये करिश्मा पाहुणी म्हणून उपस्थित राहिली. या शोमध्ये माधुरी दीक्षित आणि सुनील शेट्टी हे परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. या खास एपिसोडमध्ये करिश्मा आणि माधुरी यांच्यात पुन्हा एकदा डान्सची जुगलबंदी पाहायला मिळाली.
‘दिल तो पागल है’ या चित्रपटात ज्याप्रकारे दोघींमध्ये स्पर्धा रंगली होती, तशीच स्पर्धा आणि तीच ऊर्जा पुन्हा एकदा ‘डान्स दिवाने’च्या मंचावर पहायला मिळाली. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
करिश्मा आणि माधुरी यांच्यातील डान्सची जुगलबंदी पाहिल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘करिश्मा कपूरने उत्तम डान्स केलाय’, असं काहींनी म्हटलंय. तर ‘दोघीही आजही तितक्याच सुंदर दिसत आहेत’, असं काही युजर्सनी लिहिलंय. ‘माधुरी ऑल टाइम बेस्ट आहे’, अशीही बाजू काहींनी घेतली. डान्स परफॉर्मन्सनंतर सूत्रसंचालक भारती सिंग म्हणाली, “आज तुम्ही दोघींनी आमची सर्वांत मोठी इच्छा पूर्ण केली. दिल तो पागल है हा चित्रपट प्रत्येकाच्या आवडीचा आहे. आजसुद्धा तो चित्रपट अनेकजण आवडीने बघतात. या चित्रपटातील प्रत्येक सीन मला लक्षात आहे.”
परीक्षकाच्या खुर्चीत बसलेले सुनील शेट्टीसुद्धा करिश्मा आणि माधुरीच्या डान्सचं कौतुक करतात. “तेव्हा सुद्धा चाहत्यांचं हृदय तुम्हा दोघींसाठी वेडं होतं आणि आजसुद्धा वेडं आहे. आपल्या देशातील आणि फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत मोठे डान्सिंग स्टार्स तुम्हीच आहात,” असं ते म्हणाले.
‘दिल तो पागल है’ या चित्रपटात करिश्मा कपूने निशाची भूमिका साकारली होती. नव्वदच्या दशकात अनेक आघाडीच्या अभिनेत्रींना या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. मात्र अनेकांनी नाकारल्यानंतर करिश्माने ती स्वीकारली आणि तिच्या दमदार अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. यश चोप्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यामध्ये शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांच्याही भूमिका होत्या.