दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बाईपण भारी देवा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटातील गाण्यांना, कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता केदार शिंदे यांनी आज महिला दिनानिमित्त त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नाव आईपण भारी देवा असं आहे. केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाची घोषणा केली आहे.
'बाईपण भारी देवा' या चित्रपटानंतर आता 'आईपण भरी देवा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन केदार शिंदेंनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत. प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट ‘आईपण भारी देवा’" आईपण भारी देवा या चित्रपटाच्या पोस्टरवर "...कारण प्रत्येकाला आई असते!" असं लिहिलेलं दिसत आहे.
आईपण भारी देवा हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होईल, असं म्हटलं जात आहे. कारण केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन कॅप्शनमध्ये २०२५ चा हॅशटॅग दिला आहे. आईपण भारी देवा या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदेच करणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, बेला शिंदे या करणार आहेत. या चित्रपटाची आता प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
'बाईपण भारी देवा' या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. बाईपण भारी देवा हा "ब्लॉकबस्टर" चित्रपट ठरला. आता आईपण भारी देवा या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.