अभिनेते किरण मानेंची पोस्ट सध्या चर्चेत असून त्यांनी लिहिले की, एकाने ट्विट केले, "सरकार दरोडेखोर आहे."
त्याच्यावर कम्प्लेन्ट झाली. पोलिस म्हणाले,"काय रे, तू आपल्या सरकारला असे बोलतोस? अटक करू का?"
तो पोलीसांना म्हणाला."अहो, मी फक्त 'सरकार' लिहीलंय. ते पाकिस्तानचे, श्रीलंकेचे. इंग्लंडचेही असू शकते."
पोलीस म्हणाले, "वा रे वा. आम्हाला माहिती नाही का कुठले सरकार दरोडेखोर आहे ते ! चल आत."
अशी गत झालीय च्यायला ! काल उद्धव ठाकरेंवर एक पोस्ट केली. त्यात फक्त उद्धवजी सोडले तर कुणाचेही नांव नाही. बरं उद्धवजींचा विरोधक एक नाही. कितीतरी आहेत. गुवाहाटीवीर चाळीस तर आहेतच.. पण राणे त्रिकूटही आहे, मनसेही आहे आणि भाजपाही आहे. तरीही एबीपी माझाने स्वत:च शक्कल लढवली आणि दिली बातमी ठोकून, "किरण मानेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला."
मग पोस्ट न वाचताच ट्रोलींग सुरू झाले. बरं मी एकाला म्हन्लं, "भावा, मी शिंदेंवर टीका केलीय, राजवर नाही.." तर तो म्हन्ला, "वा रे वा... आम्हाला माहिती नाही का....." आता काय बोलणार कप्पाळ.
परवा मी 'गांधी' या ऑस्कर विनर पिच्चरची आठवण काढणारी पोस्ट केली. तर "सावरकर सिनेमाला हा कमी लेखतोय." म्हणून मला ट्रोल केले. आता का डोस्कं आपटायचं ह्या येड्यांसमोर?
बाय द वे, माझ्या फाॅलोअर्स भावाबहिणींनो. तुम्ही लै हुशार आहात. तुमच्या धडावर तुमचेच डोके आहे. माझ्यावर तुम्ही जे अतोनात प्रेम करताय, त्या प्रेमाच्या वर्षावावर उतारा म्हणून मी ट्रोलींग एंजाॅय करतो. तुम्ही प्रत्येक पोस्ट मनापासुन वाचता. पहाडाएवढा प्रतिसाद देता. तुम्हाला बरोब्बर कळते मला काय म्हणायचंय ते. 'दिल से दिल की बात' होती आपली. हे पायजे. मग ट्रोलर्स गेले तेल लावत.
अरे हो. या आपल्याला एकमेकांच्या सोबतीचा अफाट आनंद देणार्या भन्नाट प्रवासात, फेसबुकवरच्या माझ्या फाॅलोअर्सच्या संख्येने नुकताच 'एक लाखा'चा टप्पा पार केला ! एक लाख !! माझ्यासाठी ही आयुष्यभर काळजात जपून ठेवावी अशी ॲचिव्हमेन्ट आहे. आत्ता या घडीला फेसबुकवर माझी १०११३२ एवढ्या दोस्तलोकांची टीम झालीय !!!
इन्स्टावरही मी गेल्या वर्षी ॲक्टिव्ह झालो. इथेही ४१००० पार झालेत.
काहीजण म्हणतील, 'हे आभासी जग आहे.' वगैरे. पण तुम्ही ते ही खोटं ठरवलंत. हल्ली महाराष्ट्रभर तुम्ही मला आमंत्रणं देता. प्रत्यक्ष भेटायला प्रेमानं बोलावता. सत्कार, सन्मान करता. पुरस्कार देता. माझी भाषणं तुफान व्हायरल करता. गेल्या तीनचार महिन्यांत माझ्या शुटिंग्जमुळे, आणि कार्यक्रमांच्या तारखा क्लॅश झाल्यामुळे मी पन्नासेक कार्यक्रमांना जाऊ शकलो नाही... कस्लं भारीय हे !
आनंदाचे डोही आनंद तरंग...