Close

धर्मपात जात पंत यावर दादांनी सिनेमातून दाखवलेला आरसा, किरण मानेंनी शेअर केला किस्सा (kiran mane share how dada kondkde show bad points of religion caste by his Movie )

साला तुम लोगने वो तुकारामको उपर पाठव्या… तुमने साला वो मिराबाईको जहर पिलाया… संत ज्ञानेश्वरको तुम लोगोंने गाड दिया… तुम लोग सिर्फ डाकू लोगकोच पसंद करता हय." दादा कोंडकेंच्या 'राम राम गंगाराम' मधला म्हमद्या खाटिक बोलून जातो…


असलं जळजळीत परखड सत्य आपल्या अनेक सिनेमांंमधनं सांगणार्‍या दादांना 'अश्लील' म्हणून का हिणवलं गेलं हे मला आजपर्यन्त कळलेलं नाय दोस्तांनो ! स्पष्टच बोलू का? दादा कोंडके म्हन्लं की ज्यांना फक्त 'डबल मिनिंग'चे संवाद आठवतात त्यांना दादा कळलेच नाहीत ! दादांनी आपल्या पिक्चरमधनं बिनधास्तपणे सामाजिक-राजकीय भाष्य केलं… त्या काळातल्या इंदिरा गांधी-संजय गांधींच्या धोरणांवर, आणीबाणीमधल्या अराजकावर सडकून आणि बेधडक टीका केली. गायवासरू हे काॅंग्रेसचं निवडणूक चिन्ह होतं. त्याकाळात नोटा खाणारं वासरू आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणारी गाय हे दाखवणं लै खतरनाक होतं गड्याहो.


'राम राम गंगाराम'मधला म्हमद्या खाटीक आणि गंगारामची मैत्री ही नुस्ती मनोरंजनासाठी नव्हती.. त्यात हिंदू-मुस्लीम एकतेचा सामाजिक संदेशबी होता ! "मटनाच्या दुकानात भगवान शंकराच्या फोटोपुढं नमाज पडणारा म्हमद्या… ते पाहून 'भावना दुखावून' चिडनारे (मटन आनायला आलेला) भटजी… हे सगळं लै लै लै खोल होतं भावांनो ! 'ह्योच नवरा पायजे' मधला "गाॅड इज वन.. पन नेम्स आर अनेक." असं म्हणत फादरनं दिलेला क्राॅस आनंदानं गळ्यात घालणारे आणि त्याचवेळी चाॅंदभाईनं दिलेला ताईत दंडाला बांधणारे दादा ज्याला कळले.. तो दादांना कधीच 'फक्त' डबल मिनिंगमध्ये अडकवून चीप करणार नाय !
याच सिनेमात 'जाॅन बेकरी' मध्ये गेलेल्या दादा कोंडकेंना, तिथं पाव आणायला आलेला एक म्हातारा म्हणतो "काय रे शिंच्याS? हिंदू असुन गळ्यात क्राॅस घातलायस? एकादशीच्या मुहूर्तावर खिश्चन झालास की काSय?

" त्यावर दादा त्याला सुनावतात, "तुम्ही काय केलंय हो धर्मासाठी? हा बेकरीवाला जनू कांबळे.. हरीजन म्हनून तुम्ही वाळीत टाकला. अस्पृश्य म्हनून हिनवला. गावाबाहेर काढला. त्या फादरनं त्याला जवळ केला. जनू कांबळेचा 'जाॅन कॅंबल' केला..त्याला बेकरी टाकून दिली. आता त्या बेकरीतून तुम्ही पाव विकत घेताय..तुमाला लाज वाटत नाय??? यू बेशरम..तुला जोड्यानंच मारला म्हनत खाडदिशी त्याच्या मुस्काडात देणारे दादा.. आणि घाबरून गळून जाणारा तो म्हातारा… आणि त्यावर कळस म्हणजे त्याच्याकडे पाहून आजूबाजूच्या लोकांना "उचलून घेऊन जा रे याला. मी असल्याला हात लावत नसतो." 'यातलं बिटवीन द लाईन्स' कळायला मेंदू लै तल्लख लागतो माझ्या सोन्या… दादा ह्यो 'दादा' मानूस व्हता ! सलाम दादा

Share this article