अभिनेता आमिर खानची पूर्व पत्नी आणि दिग्दर्शिका किरण राव विविध मुलाखतींमध्ये तिच्या लग्न आणि घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरणने सांगितलं की लग्नापूर्वी ती आमिरसोबत वर्षभर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्यानंतर केवळ आईवडिलांच्या दबावामुळे आम्ही लग्न केलं, असंही ती म्हणाली. यावेळी किरणने लग्नसंस्थेविषयी तिचे विचार मोकळेपणे मांडले. “लग्न ही खूपच सुंदर संस्था आहे, पण यामध्ये अनेकदा महिलेकडून बऱ्याच अपेक्षा केल्या जातात. घर आणि पतीच्या कुटुंबीयांसोबतच्या सर्व नाती सांभाळण्याचा भार महिलांवर अधिक असतो”, असं ती म्हणाली.
एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत किरण पुढे म्हणाली, “आमिर आणि मी लग्न करण्यापूर्वी एक वर्ष लिव्ह इनमध्ये राहत होतो. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास आम्ही आमच्या पालकांमुळे लग्न केलं. वैवाहिक आयुष्यात तुम्ही वैयक्तिक आणि जोडीदार म्हणून व्यवस्थित राहू शकलात, तर लग्न ही संस्था खूप सुंदर आहे. माझ्या मते तुम्ही लग्नाचा अर्थ ज्या पद्धतीने मांडता, ते अधिक महत्त्वाचं आहे. कारण लग्न हे एका विशिष्ट हेतूसाठी केलं जातं आणि ही सामाजिक मान्यता खरंच अनेकांसाठी महत्त्वाची असते. मुलांसाठी ते महत्त्वाचं असतं. लग्नामुळे तुम्हाला एक नवीन कुटुंब, नवीन नातेसंबंध, सुरक्षा आणि स्थिरतेची भावना मिळते.”
लग्नानंतर स्त्री आणि पुरुष यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांमधील असमतोलाबद्दल किरण म्हणाली, “घर चालवण्याची, कुटुंबाला एकत्र ठेवण्याची अधिकाधिक जबाबदारी स्त्रीवर असते. स्त्रियांनी सासरच्या लोकांशी संपर्कात राहणं अपेक्षित असतं, त्यांनी पतीच्या कुटुंबाशी मैत्री करणं अपेक्षित असतं. या अपेक्षा खूप आहेत आणि त्या सुरळीतपणे पार पाडल्या जाण्यासाठी माझ्या मते चर्चा आवश्यक असते.”
किरण आणि आमिर यांनी लग्नाच्या १६ वर्षांनंतर घटस्फोट घेतला. २०२१ मध्ये त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित विभक्त होत असल्याची माहिती दिली. या दोघांना आझाद हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही दोघांनी त्यांच्यातील मैत्रीचं नातं कायम ठेवलं. म्हणूनच विविध कार्यक्रमांमध्ये आजही आमिर आणि किरणला एकत्र पाहिलं जातं.
किरण रावला डेट करण्याआधी आमिर खानचं रिना दत्ताशी लग्न झालं होतं. ‘लगान’ चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या वर्षभरानंतर २००२ मध्ये आमिर आणि रिना विभक्त झाले. ‘लगान’ या चित्रपटात किरणने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यामुळेच आमिरने रिनाला घटस्फोट दिला, अशा चर्चांना उधाण आलं होतं. तब्बल २२ वर्षांनंतर किरणने या चर्चांवरही मौन सोडलं. एका मुलाखतीत किरणने स्पष्ट केलं की ‘लगान’च्या शूटिंगदरम्यान ती आमिरशी फार क्वचित बोलली होती. चित्रपटाच्या तीन वर्षांनंतर २००४ मध्ये आमिर आणि किरण एकमेकांना डेट करू लागले होते.