‘कॉफी विथ करण’च्या नव्या पर्वाला २६ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. या शोच्या पहिल्या भागात बॉलीवूडची लोकप्रिय जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी हजेरी लावली होती. यानंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या भागात सनी देओल आणि बॉबी देओल हे दोघे भाऊ सहभागी झाले होते. आता कार्यक्रमात येणार तिसरी जोडी कोण असेल? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. करणच्या शोमध्ये यापुढे कोण-कोणते कलाकार होतील याचा उलगडा नव्या प्रोमोमधून झाला आहे. नव्या प्रोमोमध्ये कोणत्या कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे जाणून घेऊया…
करण जोहरच्या बहुचर्चित ‘कॉफी विथ करण’मध्ये बॉलीवूडमधील मैत्री, अफेअर, प्रेम, लग्न याबद्दल गॉसिप केलं जातं. यंदाच्या ८ व्या पर्वात रानी मुखर्जी, काजोल, आलिया भट्ट, करीना कपूर खान, रोहित शेट्टी, अजय देवगण, सारा अली खान, अनन्या पांडे यांसारखे कलाकार सहभागी होणार आहेत.
‘कॉफी विथ करण’मधील क्वीज सेक्शन सर्वांनाच आवडतं. यामध्ये करण त्याच्या सेलिब्रिटी पाहुण्यांना विविध प्रश्न विचारतो. यावेळी करणने सारा अली खानला अनन्याकडे असं काय आहे? जे तुझ्याकडे नाही असा प्रश्न विचारला यावर साराने लगेचच ‘द नाइट मॅनेजर’ असं उत्तर दिलं. या सीरिजमध्ये बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. साराने केलेला खुलासा ऐकून अनन्यादेखील सगळे मला यावरून अनन्या क्वाय कपूर असं काही ना काही बोलत असतात असं सांगितलं.
दरम्यान, ‘कॉफी विथ करण’चे सगळे भाग डिस्ने प्लस हॉटस्टार हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवले जातात. रणवीर-दीपिकाच्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता प्रेक्षकांना या सगळ्या जोड्यांमध्ये कोणत्या सेलिब्रिटीची जोडी सर्वात जास्त आवडते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.