नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरला जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली आहे. क्रांतीने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. क्रांतीला वेगवेगळ्या पाकिस्तानी आणि ब्रिटिश नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. ६ मार्चपासून तिला धमक्या आणि आक्षेपार्ह भाषेत व्हॉट्सॲपवर मेसेज येऊ लागले होते.
याबाबत पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत क्रांतीने म्हटले आहे की, मला ६ मार्चपासूनच धमक्या आणि आक्षेपार्ह भाषेतील व्हॉट्सॲप मेसेज येऊ लागले होते. यातील बहुतांश मेसेज पाकिस्तान आणि ब्रिटनमधील क्रमांकांवरून आले आहेत. क्रांतीने गोरेगाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
वानखेडे कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी जूनमध्ये समीर वानखडे आणि क्रांती रेडकर यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देण्यात आली होती. यासाठी ट्विटरच्या बनावट अकाऊंटचा वापर करण्यात आला. समीर यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही ट्विटर अकाउंटवरून धमक्या देण्यात आल्या होत्या. यावरून क्रांती खूप तणावात होती.
स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना क्रांती म्हणाली होती की, भविष्यात आमच्यावर किंवा आमच्या कुटुंबावर कोणताही हल्ला झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे जे काही घडत आहे त्याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे. त्यावेळीही क्रांती रेडकरने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे सर्वाधिक चर्चेत आले होते.