बॉलीवूड असो की हॉलिवूड चित्रपट, आता नायिकादेखील भरपूर अॅक्शन करताना दिसतात. त्यांचा गँगस्टर अवतारही प्रेक्षकांना खूप आवडतो. हिंदी चित्रपटसृष्टीतील 'फुकरे'मधली 'भोली पंजाबन' असो किंवा 'हसीना पारकर'मधली श्रद्धा कपूर असो, या अभिनेत्री नकारात्मक भूमिकेतही अव्वल ठरल्या आहेत. मोठ्या पडद्यावर गँगस्टरची भूमिका साकारलेल्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत आलिया भट्टपासून ऋचा चढ्ढापर्यंतच्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. या अभिनेत्रींच्या गँगस्टर भूमिका असलेले चित्रपट बघायचे असतील तर ओटीटीवर पाहता येणार आहेत.
पूर्वी चित्रपटांमध्ये नायिकांना फारसा वाव नसायचा परंतु आताच्या अभिनेत्री चित्रपटांत मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसतात. एवढेच नव्हे तर नायिका अन् खलनायिकाही साकारताना आपलं अभिनय कौशल्य सिद्ध करतात. पडद्यावर त्या इतकी अप्रतिम पात्रं साकारतात की जग पाहत राहते. मग ती 'गंगुबाई काठियावाडी'मधली आलिया भट्ट असो किंवा 'भोली पंजाबन' अर्थात 'फुक्रे'मधली रिचा चढ्ढा असो. या अभिनेत्रींनी निरागसतेचा मुखवटा फेकून दिला आणि नायिकेची नवी व्याख्या निर्माण केली आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींची ओळख करून देणार आहोत, ज्यांनी निर्भयपणे चित्रपटांमध्ये गुंडांच्या भूमिका साकारल्या आहेत आणि आपली कधीही पुसता येणार नाही अशी छाप सोडली आहे.
रिचा चढ्ढा - 'फुक्रे'
'फुक्रे 3' मध्ये ऋचा चढ्ढाने 'भोली पंजाबन' ची भूमिका साकारली आहे. भोली पंजाबनचे तिचे हे पात्र खूप वेगळे आहे. ती दिल्लीची डोकेबाज आणि रागीष्ट गँगस्टर आहे. आपल्या शत्रूची वाट कशी लावायची हे देखील तिला चांगलेच माहित आहे. तिला पाहून तुम्हाला हसायला देखील येईल. अशी संमिश्र व्यक्तिरेखा आहे. हे भोली पंजाबनचे पात्र वास्तविक जीवनातील गँगस्टर सोनू पंजाबनपासून प्रेरित झालेले आहे, असे म्हटले जाते.
'गंगूबाई काठियावाडी'मध्ये आलिया भट्ट
आलिया भट्टने 'गंगूबाई काठियावाडी' या चरित्रपटात दमदार अभिनय केला होता. कामाठीपुराची प्रसिद्ध माफिया राणी गंगूबाई. या चित्रपटासाठी आलियाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन' या पुस्तकापासून प्रेरित असलेल्या या चित्रपटात एका महिलेची कथा दाखवण्यात आली आहे जिने प्रत्येक अडचणीचा धैर्याने सामना केला.
कृतिका कामरा - बॉम्बे मेरी जान
आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कृतिका कामरा 'बॉम्बे मेरी जान' या वेबसीरिजमध्ये एका गँगस्टरच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. ती हबीबाची भूमिका करत आहे, जी गँगस्टर दारा इस्माईलची बहिण आहे. हुसैन झैदी यांच्या 'डोंगरी टू दुबई' या काल्पनिक पुस्तकाचे हे रूपांतर आहे. याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात कृतिका यात दिसत आहे. याच्या ट्रेलरने प्रेक्षकांना अचंबित केले.
श्रद्धा कपूर - हसीना पारकर
श्रद्धा कपूरने 'हसीना: द क्वीन ऑफ मुंबई'मध्ये तिच्या अभिनयाने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. श्रध्दा कपूर या चित्रपटात 'गॉडमदर ऑफ नागपाडा' किंवा 'आपा' म्हणून ओळखल्या जाणार्या हसीना पारकरची भूमिका साकारत आहे. तिच्या गँगस्टर लूक आणि अभिनयाची खूप प्रशंसा झाली.
ईशा तलवार - 'सास बहू और फ्लेमिंगो'
ईशा तलवारने 'सास बहू और फ्लेमिंगो' या मालिकेतील 'बिजली' ही नकारात्मक भूमिका साकारून आपल्या अभिनय कौशल्याची प्रचिती दिली. ही बिजली तिच्या सासूसोबत ड्रग्सचे साम्राज्य चालवताना दिसते. हे अनोखे पात्र साकारण्याचे खरं तर ईशापुढे आव्हानच होते. कारण बिजली केवळ ड्रग माफियाचा भाग नाही तर एलजीबीटीक्यू समुदायाचे प्रतिनिधित्व करते.
'सास बहू और फ्लेमिंगो'मध्ये राधिका मदन
'सास बहू और फ्लेमिंगो'मध्ये ईशा तलवारने ड्रग्ज माफियांच्या जगात एका बदमाश सूनेची भूमिका साकारली होती, पण राधिका मदनने या कथेला वेगळा ट्विस्ट आणला होता. राधिकाने शांता नावाच्या मुलीची भूमिका केली, जी तिच्या आईच्या अंमली पदार्थांच्या साम्राज्यात सक्रियपणे भाग घेते. राधिकाने साकारलेली शांता ही तिच्या खऱ्या आयुष्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
नेहा धुपिया - 'फंस गए रे ओबामा'
२०१० मध्ये आलेल्या 'फंस गए रे ओबामा' या चित्रपटात नेहा धुपियाने स्टिरियोटाइप तोडून खोलवर प्रभाव टाकणारी भूमिका साकारली होती. तिने 'मुन्नी मॅडम' ही व्यक्तिरेखा साकारली होती, जी पुरुषांबद्दल तीव्र तिरस्कार असलेली एक जरब असलेली गँगस्टर होती. त्यावेळी तिची तुलना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक 'गब्बर सिंग'शी केली जाऊ लागली होती.