‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. आजपासून तुळजाचा लग्नसोहळा सुरू होणार आहे. नऊ दिवस हा लग्नसोहळा रंगणार असून ६ सप्टेंबरला तुळजा नेमकी कोणाशी लग्नगाठ बांधणार सिद्धार्थ की सत्यजितशी? हे उलगडणार आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे.
‘झी मराठी’ वाहिनीच्या सोशल मीडियावर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील लग्नसोहळा विशेषचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सूर्या तुळजाच्या लग्नाचं आमंत्रण देताना दिसत आहे. “काय मग मंडळी बातमी समजली का? आपल्या तुळजाच लग्न ठरलंय”, ही आनंदाची बातमी देत सूर्या लग्नातील समारंभ सांगताना पाहायला मिळत आहे. तुळजाच्या लग्नाचं आमंत्रण देताना सूर्याच्या मनात दुःख व आनंद या दोन्ही भावना निर्माण झाल्याचं त्याच्या चेहरावर दिसत आहे.
पुढे सूर्या लग्न समारंभरातील तुळजाच्या लूकविषयी बोलत आहे. तो म्हणतो, “मुंडवळ्या बांधलेली तुळजा कसली गोड दिसेल ना? त्यात तिच्या तळ हातावर मेहंदी रंगणार, तिच्या गोऱ्या हातामधला हिरवा चुडा शोभून दिसणार, आई शप्पथ सांगतो हळदीत नाहून गेलेलं तुळजाचं रुपडं कसलं खुलून दिसलं. कारण तुळजाचं लग्न तिला सुखात ठेवणाऱ्या पोराशी होणार आहे. पण सूर्या तुळजाचं स्वप्न पूर्ण करणार की डॅडींचा विश्वास जपणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
आज आणि उद्या (२८ ऑगस्ट) तुळजाच्या लग्नाचा मुहूर्तमेढ असणार आहे. त्यानंतर २९ आणि ३० ऑगस्टला तुळजाच्या हातावर मेहंदी रंगणार आहे. ३१ आणि १ सप्टेंबर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. ३ आणि ४ सप्टेंबरला तुळजाला हळद लागणार आहे आणि अखेर ६ सप्टेंबरला तुळजा लग्नबंधनात अडकणार आहे. पण तुळजा सिद्धार्थ की सत्यजितशी लग्नगाठ बांधणार? की भलतच काहीतरी घडणार? याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.