किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटात फुल कुमारीची भूमिका साकारून अभिनेत्री नितांशी गोयलने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. अवघ्या १७ वर्षांच्या नितांशीने लोकप्रियतेच्या बाबतीत मोठमोठ्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे.
अभिनेता आमिर खानची पूर्व पत्नी किरण रावने तब्बल १३ वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केलंय. तिचा 'लापता लेडीज' हा चित्रपट आधी थिएटरमध्ये आणि त्यानंतर २६ एप्रिलपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
'लापता लेडीज'मधील कलाकारांचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. यामध्ये फुल कुमारीची भूमिका अभिनेत्री नितांशी गोयलने साकारली आहे. नितांशी ही केवळ १७ वर्षांची असून तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
इतकंच नव्हे तर या १७ वर्षीय नितांशीने बॉलिवूडच्या मोठमोठ्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. IMDb ने जाहीर केलेल्या सर्वांत लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत तिने बाजी मारली आहे. नितांशी या टॉप २३ सेलिब्रिटींच्या यादीत अग्रस्थानी आहे. सध्या देशभरात तिचीच चर्चा आहे.
ही गोष्ट स्वप्नवत असल्याची भावना नितांशीने व्यक्त केली आहे. 'लापता लेडीज' प्रदर्शित झाल्यापासून नितांशीच्या फॉलोअर्समध्येही तुफान वाढ होत आहे. इन्स्टाग्रामवर तिचे दहा दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. नितांशीने याआधी काही मालिकांमध्ये काम केलंय.
'लापता लेडीज'मध्ये नितांशीसोबतच प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन, छाया कदम यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. एकंदर या चित्रपटाची कथा, कलाकारांचं अभिनय, दिग्दर्शन या सर्वच गोष्टींचं भरभरून कौतुक होत आहे.