Close

महाराष्ट्राच्या लावणीचा सुवर्णकाळ दाखवणारी नवी मालिका ‘लावणी महाराष्ट्राची’ ( ‘Lavani Maharashtrachi’,  A New Program Will Showcase The Golden Era Of Traditional Dance Form)

आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख लोकनृत्य म्हणजे ‘लावणी’. लावणी म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते ठसकेबाज नृत्य आणि लावण्यवतीची दिलखेचक अदा. लावणी नृत्य सादर करणं किंवा ते शिकणं ही पण एक कलाच आहे. लावणीच्या कार्यक्रमांना अजूनही तितकाच उदंड प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळतोय. लावणी हे नृत्य दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालले आहे.

आपल्या महाराष्ट्राची कला जपणं हे प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षकांचं कर्तव्य आहे असं म्हणायला सुध्दा हरकत नसेल. लावणी ही लोककला जपण्यासाठी ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी वाहिनीने देखील पुढाकार घेतला आहे. “ढोलकीची थाप आणि तुणतुण्यासोबत झंकारणार घुंगराचे चाळ…” असं म्हणत ‘सन मराठी’ वाहिनी पुन्हा एकदा जिवंत करणार महाराष्ट्राच्या लावणीचा सुवर्णकाळ. ‘लावणी महाराष्ट्राची’ हा नवीन मनोरंजक कार्यक्रम आज २५ फेब्रुवारीपासून दर रविवारी रात्री ९ वाजता सन मराठीवर सुरु होणार आहे.

नुकतीच, ‘लावणी महाराष्ट्राची’ या कार्यक्रमाची झलक सोशल मिडीयावर दाखवण्यात आली. या कार्यक्रमात मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय आणि कलागुण संपन्न अशा अभिनेत्रींचा सहभाग असणार आहे. अभिनेत्री किशोरी शहाणे, सोनाली कुलकर्णी, स्नेहलता वसईकर, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी यांच्या सुरेख सादरीकरणामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढणार हे नक्की. प्रेक्षक आणि कार्यक्रम यांना जोडून ठेवण्याचं काम निवेदक सुध्दा करत असतो तर या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची जबाबदारी अभिनेते दिगंबर नाईक पेलणार आहेत.

लावणी नृत्याच्या संदर्भात महाराष्ट्रातील अनेक संगीतकार, कवी, आणि कलाकारांनी लावणीच्या क्षेत्रात कामं केली आहेत. त्यांची कला आणि संगीत परंपरा महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक विरासतीचा अमूल्य भाग आहे. आपल्या या कलेचा वारसा जपण्यासाठी सन मराठीने एक पाऊल उचललं आहे.

Share this article