Close

लिंबू आहे बहुगुणी (Lemon Is Versatile)

लिंबू फक्त सरबत बनवून पिण्यासाठी एवढ्याच उपयोगाचं नसून, त्याचे बरेच उपयोग आहेत. तरीही सकाळची सुरुवात लिंबाचं पाणी पिऊन केली की, संपूर्ण दिवसभर ताजं राहता येतं.

स्वयंपाकघरातील दोन महत्त्वाचे पदार्थ म्हणजे हळद आणि लिंबू. दोघेही रंगाने पिवळे. पिवळेपणात फरक पण गुणधर्म सारखेच. म्हणजे आरोग्यदायक आणि सौंदर्यवर्धक. आता आपण फक्त लिंबाचाच विचार करू. लिंबू फक्त पिळण्यासाठी आणि सरबत पिण्यासाठी एवढेच उपयोगाचे नसून त्याचे बरेच उपयोग आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची क्षमता त्यात आहे. आपल्याला घाम येतो, थकवा येतो तेव्हा शरीराची झालेली झीज, लिंबांमध्ये असलेल्या ग्लुकोज आणि खनिज द्रव्यांद्वारे भरून निघते.
सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात लिंबू पिळून ते पाणी प्यायल्यास, अंगातील विषद्रव्यं निघून जाण्यास मदत होते. शरीरात साचलेली घाण बाहेर फेकण्याचे गुण त्यात असल्याने वजन कमी होतं. वजन कमी करू इच्छिणार्‍यांसाठी हा सोपा मार्ग आहे. शिवाय सकाळच्या या पेयपानानं त्वचा स्वच्छ व चमकदार होते, असंही काहींचं निरीक्षण आहे.

लिंबाच्या पाण्यात मध टाकून प्यायले तर कफाचा त्रास असणार्‍यांना बरं वाटतं. शिवाय लिंबाचा रस आणि मध एकत्र करून सकाळीच चेहर्‍याला लावा. याच्याने चेहर्‍याची त्वचा आर्द्र, चमकदार होते. अन् नियमितपणे असं केल्यानं रंग उजळण्यास मदत होते.
लिंबाच्या रसाने केस धुवावेत. म्हणजे आंघोळ करताना शाम्पू लावून झाल्यावर, एक मग पाण्यात एका लिंबाचा रस मिसळावा. अन् त्याच्याने केस धुवावेत.
चहाचा चोथा मग भर पाण्यात टाकून त्यामध्ये एका लिंबाचा रस घाला व या मिश्रणाने (शाम्पू नंतर) केस धुवा. वरील दोन्ही प्रकारांनी केस चमकदार होतात.
नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनांचा एक घटक म्हणून लिंबू कामी येतं. मात्र केवळ लिंबाच्या रसाचा वापर करू नये. त्यामध्ये पाणी मिसळून मग वापरावे.
तळहाताच्या सौंदर्यासाठी लिंबू अतिशय गुणकारी आहे. त्याचे हँड लोशन तयार करता येते. गुलाबपाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळा व त्याने हात धुवा. तसेच लिंबू-पाणी हातावर घ्या अन् त्यामध्ये साखरेचे दाणे टाका. नंतर ही साखर विरघळेपर्यंत लिंबू-पाणी हातावर चोळा. नंतर हात पाण्याने स्वच्छ धुवा. असे नियमितपणे केल्यास हाताची त्वचा मुलायम व स्वच्छ होते. खरखरीत हात असलेल्यांना गुण येईल.

तेलकट त्वचेच्या समस्येवरही लिंबू उत्तम. विशेषतः चेहरा तेलकट दिसला तर ओशाळवाणं वाटतं. त्यावर तोडगा म्हणून ग्लासभर पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस घाला. अन् या लिंबू पाण्यानं चेहरा छान धुवा. त्याच्यानं चेहर्‍यावरील तेल कमी होईल. उन्हाळ्याच्या दिवसात हे पाणी फ्रिजच्या आईसक्युब ट्रे मध्ये गोठवा. गोठलेला बर्फाचा क्युब टिश्यू पेपर किंवा स्वच्छ कापडात गुंडाळा नि हळूहळू चेहर्‍यावर फिरवा. चेहर्‍याचा तेलकटपणा कमी होईल आणि चेहरा अतिशय ताजातवाना दिसेल.
नैराश्य आलं असल्यास लिंबू गुणकारी ठरतं. संपूर्ण लिंबाचा वापर नैराश्य, तणाव दूर करतो. काही डॉक्टरांच्या मते लिंबू फ्रिजरमध्ये गोठवून घ्यावं. नंतर ते सालीसकट किसून घ्यावं आणि हे किसलेलं लिंबू (साल आणि रसासकट) भाजी-वरण यांच्यावर शिंपडावं. असं केल्याने त्या पदार्थाला एक वेगळीच चव येईल. अन् ताणतणाव कमी होण्यास मदतही होईल.
आपण पोहे, मटण, चिकन, मासे, आमटी, काही भाज्या यांच्यावर लिंबू पिळून खातो. यामुळे या पदार्थांची चव वाढते, शिवाय अन्न पचन चांगले होते. रक्ताभिसरण वाढते. आतड्यातील रस जास्त प्रमाणात पाझरण्यास मदत होते.
लिंबू रसाबरोबरच त्याची सालही गुणाची आहे. लिंबाची साल किसून पुडींग, केक आणि सुफ्ले यांच्यामध्ये घातल्यास त्याचा वेगळाच स्वाद लागतो. काही संशोधकांच्या मते अशी किसलेली साल खाल्ल्याने कॅन्सरशी मुकाबला करता येतो.
अमेरिकेच्या बाल्टीमोर येथील इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस यांनी केलेल्या एका अभ्यास अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, लिंबाची साल बॅक्टेरिया आणि फंगस यांची वाढ होऊ देत नाही. शिवाय कॅन्सर सेल्सशी टक्करही देते. कॅन्सरला पोषक असलेल्या पेशींना ती नष्ट करते. तेव्हा लिंबाची साल टाकून देण्यापूर्वी विचार करा.

Share this article