बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांचा १३ मे रोजी साखरपुडा झाला. दिल्लीच्या कपूरथळा हाऊसमध्ये झालेल्या या दोघांच्या सारखपुड्याचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. तेव्हापासून परिणीती आणि राघव चड्ढा कधी लग्नगाठ बांधणार याची चर्चा सुरू आहे. ऑक्टोबर २०२३मध्ये दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. पण लग्नापूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा आज अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यानचे दोघांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या व्हिडीओत, टाइट सिक्युरिटीबरोबर परिणीती आणि राघव चड्ढा हे दोघं अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी गेल्याचं दिसतं आहे. दोघंही गुरुद्वारमध्ये नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी परिणीती पांढऱ्या रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसतं आहे. तर राघव चड्ढा यांनी कुर्ता-पायजामा आणि राखाडी रंगाचं नेहरु जॅकेट घातलं आहे.
परिणीती आणि राघव चड्ढांच्या गुरुद्वारमधील व्हिडीओला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “हा कुठला नियम आहे? जेव्हा आम्ही गेलो होतो, तेव्हा आम्हाला पूर्ण डोक्यावर ओढणी घ्यायला सांगितली होती. पण यांच्यासाठी सर्व काही माफ.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “देवाच्या दारातही शो ऑफ.” शिवाय अजून एकानं लिहिलं की, “इतक्या सिक्युरिटीबरोबर दर्शनासाठी कोण जातं?” परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती इम्तियाज अलीच्या ‘चमकीला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ दिसणार आहे.