उद्या शनिवारी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या हॉट सीटवर अभिनेता - दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेता शिवाजी साटम येणार आहेत. हे दोघे व सूत्रधार सचिन खेडेकर जुने मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या मैत्रीचे अनोखे बंध या विशेष भागात आपल्याला पाहायला मिळतील.
पहिल्यांदा झालेली भेट, पहिल्या ऑडिशनची आठवण आणि पहिले नाटक यांचे मजेदार किस्से हे तिघे आदानप्रदान करणार आहेत. 'दया कूछ तो गडबड है ' हा सी. आय. डी. मालिकेतील संवाद म्हणून महेश मांजरेकर यांनी शिवाजी साटम यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील या लोकप्रिय कार्यक्रमाच्या मैत्री विशेष कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की, हा विशेष भाग कॅन्सर पेशंटस् एड असोसिएशन या संस्थेसाठी खेळणार आहेत. महेश मांजरेकर स्वतः कॅन्सरच्या आजारातून बरे होऊन आले आहेत. त्यामुळे कॅन्सर पेशंटस्ना कोणत्याही प्रकारे, जी काही मदत करता येईल, त्यासाठी नेहमीच पुढाकार घेणार असे त्यांनी यावेळी सांगितले.