Close

‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या नव्या मालिकेची नायिका साकारतेय् कोल्हापूरचे दागिने बनविणारी कलाकार (Main Lead Of New Marathi Series ‘Laxmichya Pavlani’ Portrays The Character Of Ornaments Making Artist From Kolhapur)

स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन नवनव्या मालिका सादर केल्या आहेत. मनोरंजनाच्या या प्रवाहात लवकरच एक नवी मालिका सामील होणार आहे. मालिकेचं नाव आहे ‘लक्ष्मीच्या पावलांनी’. सुप्रसिद्ध अभिनेत्री इशा केसकर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. कला खरे असं तिच्या भूमिकेचं नाव असून एका वेगळ्या रुपात इशा प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

स्टार प्रवाहसोबतची ही पहिली मालिका साकारण्यासाठी इशा प्रचंड उत्सुक आहे. या मालिकेविषयी सांगताना इशा म्हणाली, ‘सध्या सगळीकडेच नवरात्रौत्सवाची धामधूम सुरु आहे. अशा या मंगलमय वातावरणात लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेचा प्रोमो येतोय ही खूप भारावून टाकणारी गोष्ट आहे. या मालिकेत मी कला खरे ही भूमिका साकारत आहे.नावाप्रमाणेच कला एक उत्तम कलाकार आहे. तिला हातकाम, रंगकला आणि चित्रकलेची आवड आहे. ती देवीची मूर्ती आणि दागिने घडवते. अंबाबाईच्या देवळाबाहेर कलाचं दागिन्यांचं दुकान आहे. ती स्वतःच्या हाताने सर्व पारंपारिक दागिने अगदी मनापासून बनवते. संपूर्ण कोल्हापूर शहरात तिने बनवलेले दागिने प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या कलाला गरीब-श्रीमंत असा भेद केलेला आवडत नाही. हे पात्र प्रत्येकाला आपलसं वाटेल असं आहे. आजवर माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे. हेच प्रेम कला आणि आमच्या लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे.

मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळतेय. किशोरी अंबिये माझ्या आईची भूमिका साकारत आहेत. किशोरी ताईंसोबत याआधीही काम केलं आहे. त्यामुळे सीन्स खूप छान होत आहेत. कोल्हापूरातल्या अनेक प्रसिद्ध ठिकाणी आम्ही सध्या शूट करत आहोत. मालिका सुरु होण्यापूर्वीच कोल्हापुरकरांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.’

‘लक्ष्मीच्या पावलांनी’ ही मालिका २० नोव्हेंबरपासून रात्री ९.३० वाजता दिसेल. तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ त्या दिवसापासून रात्री १० वाजता असेल.

Share this article