'हिरामंडी द डायमंड बझार' या सिनेमातून अभिनेत्री मनीषा कोईरालाने बऱ्याच काळाने सिनेविश्वात कमबॅक केलंय. संजय लीला भन्साळी यांच्या या बिग बजेट प्रोजेक्टमध्ये मनीषाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या सिनेमात १९४० या स्वातंत्र्यपूर्व दशकातील काळ दाखविण्यात आला असून मनीषा यात मल्लिकाजान या तवायफची भूमिका साकारतेय.
उच्चभ्रू वेश्यांची मालकीण असलेल्या एका श्रीमंत तवायफच्या भूमिकेत मनीषा दिसली आहे. या सिनेमाच्या प्रोमोशननिमित्त मनिषाने दिलेल्या एका मुलाखतीत तिला आयुष्यात कोणत्या गोष्टीचा जास्त पश्चाताप होतोय याविषयी खुलासा केला.
नुकतंच मनिषाने इंडिया टुडेला मुलाखत दिली. तेव्हा तिला करिअरमधील कोणत्या निर्णयाचा सगळ्यात जास्त पश्चाताप होतो याविषयी विचारण्यात आलं. यावेळी ती म्हणाली,"मी कधीच यश चोप्रा यांच्या सिनेमात काम केलं नाही याचा मला खूप पश्चाताप होतो. मला सिनेमात माधुरीजींच्या विरुद्ध काम करायचं होतं आणि मी घाबरले. तो प्रोजेक्ट त्यामुळे मी सोडून दिला."
त्यानंतर बऱ्याच काळाने मनिषाने माधुरीसोबत लज्जा या सिनेमात स्क्रीन शेअर केली. या सिनेमात तिने केलेलं काम आणि तिच्यावर आणि माधुरीवर चित्रित झालेला 'बडी मुश्किल' या गाण्यावरील डान्स बराच गाजला होता. याबाबत सांगताना ती म्हणाली,"माधुरीजी या एक उत्तम अभिनेत्री आणि व्यक्ती आहेत.
मला असुरक्षित वाटून घेण्याची काहीही गरज नव्हती. माझ्यासमोर एक इतकी दमदार अभिनेत्री असताना तुम्ही अजून चांगलं परफॉर्म करू शकता. त्या तुम्हाला अजून चांगला परफॉर्म करायला प्रोत्साहन देतात. आणि तुमचा अनुभव आणि वय तुम्हाला शिकवतं. मला त्या सिनेमातील माधुरी यांचं काम आवडलं आणि रेखा यांचंसुद्धा."
सूत्रांच्या माहितीनुसार, मनीषाला 'दिल तो पागल है' या सिनेमात काम करण्याची ऑफर सिनेमाचे निर्माते यश चोप्रा यांनी दिली होती पण मनिषाने ती ऑफर नाकारली आणि मग ही भूमिका करिष्मा कपूरने साकारली. हा सिनेमा चांगलाच सुपरहिट झाला होता. शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांचीही या सिनेमात मुख्य भूमिका होती.